नागपूर - उद्योगमंत्री नारायण राणे यांचा पक्षाने विश्वासघात केल्याचा आरोप फेटाळून लावताना पक्षाने त्यांना सातत्याने मंत्रिपद दिल्याची आठवण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी करून दिली. राणे यांना मंत्रिपदापलीकडे जाऊन काही हवे असल्यास त्यांनी नेतृत्वाकडे मागणी करावी, असा खोचक सल्लाही प्रदेशाध्यक्षांनी शनिवारी नागपुरात बोलताना दिला.
उद्योगमंत्री नारायण राणे सध्या पक्षावर नाराज आहेत. सोमवारी मंत्रिपद सोडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बोलत होते.
राणे यांना मुख्यमंत्री न केल्याने ते नाराज असल्याचे आरोप त्यांनी फेटाळले. राणे यांच्या नाराजीनंतर आपली त्यांची भेट झाली आहे. सोमवारी त्यांना पुन्हा भेटणार असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. ठाण्यातील काही नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश घेतल्याच्या घटनाक्रमावर बोलताना काही ठरावीक अपेक्षेने त्यांनी पक्षांतर केल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.