आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Praised Devendra Fadanvis, Divya Marathi

नरेंद्र मोदींची खेळी: देवेंद्र फडणवीसांचे कौतुक, नितीन गडकरींना ‘चेक’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - नागपूर येथील जाहीर सभेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांचे तोंडभरून कौतुक करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भाजपमधील मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून देवेंद्र नावावर एकप्रकारे शिक्कामोर्तबच केल्याचे संकेत दिले आहेत. भाजपचे राज्यातील ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समक्षच मोदींनी देवेंद्र यांच्यावर केलेला हा कौतुकाचा वर्षाव म्हणजे गडकरींना एकप्रकारे ‘चेक’च दिला असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

नरेंद्र मोदी यांची मंगळवारी नागपुरात सभा झाली. याच शहरातून फडणवीस विधानसभा निवडणूक लढवित आहेत. राज्यात भाजपची सत्ता आल्यास देवेंद्र हेच मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असतील, असे भाजपमधील एक गट सांगतो. मात्र एकनाथ खडसे, विनोद तावडे हेही या पदावर दावा करत आहेत. तर ऐनवेळी गडकरींना राज्यात पाठविण्याची खेळीही खेळली जाऊ शकते, असा अंदाजही राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. मात्र मोदींनी मंगळवारी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. इतकेच नव्हे तर व्यासपीठावर एका बाजूला गडकरी असतानाही दुस-या बाजूला बसलेल्या फडणवीस यांच्याशीच मोदी प्रत्येक वेळी गुफ्तगू करताना दिसले.

भाजपची सबुरी : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर संयम
मुंबई| शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजपवर थेट हल्लाबोल करत असतानाच भाजपने मात्र थेट प्रत्त्युत्तर न देता सबुरीची भूमिका घेतली आहे. उद्धव ठाकरेंवर थेट ‘हल्ला’ करण्यापेक्षा शिवसेनेच्या प्रचाराला मुद्देसूद उत्तरे देण्याचे धोरण सध्या भाजपचे राज्यातील नेते अवलंबवत असल्याचे दिसून येते. निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेसाठी शिवसेनेची गरज लागल्यास कटूता निर्माण होऊ नये, यासाठी भाजप ही दक्षता घेतल्याचे बोलले जात आहे. युती तुटल्यानंतर शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये जरी विसंवाद झाला असला तरी संबंधांमध्ये कटुता येणार नाही असे अंदाज बांधले जात होते. मात्र शिवसेनेने भाजपवर तुफानी हल्ला चढवण्यास सुरुवात केली आहे. नरेंद्र मोदींना ‘अफझल खान’ अशी उपाधी त्यांनी दिली.

भीती त्रिशंकूची : सारे काही सत्तेसाठी
शिवसेनेसोबतची युती तोडण्याची भाजपची सुरुवातीपासूनच योजना होती, असे आरोप शिवसेनेकडून जाहीर सभांमधून केले जात आहेत. मात्र या भावनिक आरोपावरही भाजपने प्रत्युत्तर देणे टाळले आहे. मुंबईतल्या सभेत मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी महाराजांच्या नावाने हप्तेवसुली केली जाते असा अप्रत्यक्ष आरोप शिवसेनेचे नाव न घेता केला. त्यावर संतापलेल्या उद्धव ठाकरेंनी लगेचच प्रत्युत्तर दिल्यानंतर भाजपने पुन्हा अधिक सावध भूमिका घेतली आहे. भविष्यात राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास सत्तास्थापनेसाठी शिवसेनेची मदत लागू शकते हे लक्षात घेऊन भाजपने शिवसेनेवर थेट आरोप करून उद्धव ठाकरेंना न दुखावण्याचे धोरण भाजपने अवलंबले आहे.

महाराष्ट्रातच राहणार मुंबई
मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा प्रमुख आरोप शिवसेनेकडून वारंवार केला जात आहे. या आरोपामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊन पक्षाला फटका बसू शकतो ही बाब लक्षात घेऊन भाजपने लगेच डॅमेज कंट्रोलला सुरुवात केली आहे. शिवसेनेच्या या आरोपाला प्रतिआरोपाने उत्तर न देता मोदींसह भाजपच्या सर्वच नेत्यांनी एकमुखाने ‘मुंबई शिवाय महाराष्ट्र ही कल्पनाच करवत नाही’ अशी ग्वाही दिली आहे. मोदींनी तर याहीपुढे जात महाराष्ट्रासह मुंबई हीच देशाला प्रगतिपथावर नेईल, असे वक्तव्यही मोदी यांनी केले आहे.

नागपुरात नमोंची जादू चालली नाही
-नरेंद्र मोदींची जाहीर सभा गर्दीच्या दृष्टीने विराट राहील, हे नागपुरातील भाजप नेत्यांचे दावे जाहीर सभेला जमलेल्या जेमतेम गर्दीने फोल ठरवले. कस्तूरचंद पार्कचा परिसर सोडला तर कुठेही जाहीर सभेचे वातावरण जाणवत नव्हते. कुठेही वाहतुकीची कोंडी झाल्याचे चित्र नव्हते. जनसमुदायात उत्स्फूर्ततेचा संपूर्ण अभाव जाणवत होता. मोदी.. मोदी..चा जयघोष अभावानेच आढळून आला. लयबद्ध भाषणाचा अभाव आणि त्याच त्या मुद्यांमुळे मोदींना श्रोत्यांच्या मनांची पकड घेता न आल्याने श्रोत्यांमधून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे जाणवत होते. नागपूरकरांवर आपली छाप सोडण्यात नमों पुन्हा अपयशी ठरले, अशी चर्चा उपस्थितांत होती.
पुढे वाचा...