आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nation Develope Through Giving Chance To Woman, Actress Amish Patel

महिलांना संधी दिल्यास देशाचा विकास, सिने अभिनेत्री अमिषा पटेलचे प्रतिपादन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - ‘आपण देशाला केवळ भूमी न म्हणता ‘मातृभूमी’ असे संबोधून देशाप्रती अतिव आदर व्यक्त करतो. दुसरीकडे जिवंत महिलांवर नानाविध अत्याचार व स्त्री भू्रणांची हत्या करून मातृशक्तीचा घोर अपमान करत आहोत. या दुटप्पी धोरणामुळेच आज समाजात अनेक गंभीर समस्या उद्भवल्या आहेत. घराचे घरपण टिकवण्यासाठी अहोरात्र राबणा-या महिलांना हीन न लेखता, योग्य संस्कार आणि शिक्षणाची समान संधी दिल्यास देशाचा सर्वांगीण विकास होईल,’ असे आवाहनात्मक प्रतिपादन प्रसिद्ध सिने अभिनेत्री अमिषा पटेल हिने केले.
प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्ट, शोध प्रतिष्ठान आणि अमरावती गार्डन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन अमिषाच्या हस्ते झाले. अमिषा म्हणाली, घरातील संस्कार आणि शिक्षणामुळेच महिलांचा सन्मान होतो. त्यामुळे देशातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाचा गंध पोहोचायला हवा. शिक्षणाचा पाया मजबूत झाल्याशिवाय स्त्री भ्रूणहत्या व महिलांवरील अत्याचार थांबणार नाहीत. माध्यमांद्वारे महिलांवर अत्याचार होणा-या घटना जेव्हा बघते, तेव्हा अंत:करण भरून जाते, अशी खंतही अमिषाने व्यक्त केली.
तीन दिवस चालणा-या सांस्कृतिक महोत्सवात विदर्भस्तरीय पुष्पप्रदर्शन व स्पर्धा, चित्रकला प्रदर्शन व स्पर्धा, बचत गटांच्या वस्तूंचे प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन तसेच अभ्यासिका कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला नागरिकांची मोठी गर्दी होती.
चाहत्यांना केले घायाळ
भाषणाच्या सुरुवातीलाच अभिनेत्री अमिषा पटेलने मराठमोळ्या शैलीत ‘येथे मला येऊन खूप आनंद झाला,’ या शब्दांनी उपस्थित हजारो चाहत्यांना घायाळ केले. प्रेक्षकांनीही या वाक्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘अमिषा, अमिषा’ असा एकच आवाज कानी पडत होता. अमिषाची अदा टिपण्यासाठी कॅमे-यांची चढाओढ लागली होती. यापूर्वी अमिषा मंचावर येताच प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. या वेळी चोख पोलिस बंदोबस्त होता.