आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National Kabaddi Player Doing Farming Work In Amaravati

PHOTO: या आहेत पाच वेळा नॅशनल चॅम्पीयन असलेल्या कब्बडी प्लेयर, पण आता करतात शेतात काम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावतीः कबड्डीत पाच राष्ट्रीय विजेतेपदं मिळवणाऱ्या पुष्पा कांबळे या माजी खेळाडूला वयाच्या पन्नाशीतही मजुरी करून उदरनिर्वाह करावा लागत आहे. देशात त्यांच्यासारखे अनेक खेळाडू आहेत, ज्यांनी खेळात उज्ज्वल कामगिरी केली. मात्र, प्रत्यक्ष जीवनात दोन वेळची भाकरी मिळवण्यासाठी त्यांना वणवण करावी लागत आहे. पुष्पा यांनी १९८० ते ८८ पर्यंत राष्ट्रीय, राज्य आणि विदर्भातील अनेक स्पर्धा गाजवल्या. त्या वेळी कबड्डी हेच त्यांचे सर्वस्व होते. घरची परिस्थिती खराब असतानाही त्या कबड्डीत चमकत हाेत्या.

घरची कमकुवत परिस्थिती, लहान भावंडांची खांद्यावर येऊन पडलेली जबाबदारी, शासनाचा नाकर्तेपणा अन् नंतर लग्न यांमुळे पुष्पा यांची कबड्डी कारकीर्द पूर्णत: संपुष्टात आली. बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर अन् तीनदा नोकरीसाठी प्रयत्न केल्यानंतर हाती काहीच आले नाही. त्यामुळे त्यांनी कबड्डीच्या खेळाला राम राम ठोकला. सध्या त्या ५० वर्षे वयाच्या असून, भातकुली तालुक्यातील जळका हिरापूर येथे त्यांचे पती, तीन मुलांसोबत वास्तव्यास आहेत. राहण्यासाठी झोपडीवजा घर, दोन-तीन गायी, दोन एकर शेती हाच त्यांचा संसार. संसाराचे गाडे पुढे हाकण्यासाठी सध्या त्यांना दुसऱ्याच्या शेतावर दोनशे रुपये रोजीने मजुरी करावी लागते.

युवक क्रीडा मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते कबड्डीप्रेमी अन् मूळ याच गावातील रहिवासी दिनेंद्र ठाकरे काही कामानिमित्त कांबळे यांच्या घरी गेले असता, त्यांना पुष्पा यांच्या कबड्डीतील कौशल्याबाबत माहिती मिळाली. त्यांनी एका कोपऱ्यात ठेवलेल्या पिशवीतून पदकं आणि काहीशी जीर्ण झालेली प्रमाणपत्रे काढून दाखवली. ती बघून जिनेंद्र यांना आश्चर्याचा धक्काच बसला. ते ही किमती सामग्री घेऊन अमरावतीत आले. त्यांच्या प्रयत्नाने एका राष्ट्रीय खेळाडूच्या समस्यांना वाचा फोडली आहे. पुढील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत युवक क्रीडा मंडळ या माजी उत्कृष्ट कबड्डीपटूचा सत्कार करणार असून, त्यांना शक्य असेल ती मदतही करणार आहे.
पंच म्हणून नियुक्त करण्याचा प्रयत्न
पुष्पाकांबळे यांच्याबद्दल अमरावती जिल्हा कबड्डी संघटनेचे सचवि आर. एस. साहू आणि विदर्भ हौशी कबड्डी संघटनेचे सचवि जितू ठाकूर यांनी सहानुभूती व्यक्त करून त्यांना भविष्यातील प्रत्येक स्पर्धेत पंच म्हणून नियुक्त केले जाईल. तसेच शक्य असेल, तशी मदतही करता येईल, असे सांगितले.
पुढील स्लाईडवर वाचा, पदकांची झाली दुरवस्था, तर प्रमाणपत्रांवर धूळ