नागपूर - जितेंद्र आव्हाड यांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून सभागृहाच्या कामकाजावर राष्ट्रवादीने बहिष्कार घातलेला असला तरी काँग्रेस त्यांना साथ देणार नाही. ‘आव्हाड यांचे निलंबन हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही सोमवारपासून कामकाजात भाग घेणार आहोत,’ असे काँग्रेसचे गटनेचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना स्पष्ट केले.
विधानसभा गिवडणुकीत वेगळे झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीची विरोधी पक्षनेतेपदावरून हमरीतुमरी सुरू झाली असल्याने सत्ताधारी भाजपचे फावताना दिसत आहे. या दोघांच्या
आपसातील भांडणामुळेच विधिमंडळाचे पहिल्या आठवड्याचे काम विरोधी पक्षनेत्याविनाच पार पडले. शुक्रवारी आव्हाड यांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीने कामकाजावर बहिष्कार घालत सभात्याग केला.
राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांनी सांगितले, ‘केवळ एक दिवसच नव्हे तर आव्हाड यांचे निलंबन
मागे घेईपर्यंत आम्ही कामकाजावर बहिष्कार घालणार आहोत.’ या निर्णयात काँग्रेसही तुमच्यासोबत आहे का असे विचारता छगन भुजबळ म्हणाले, ‘आम्ही विरोधक एकत्रच आहोत. मात्र त्यांना वेगळा निर्णय घ्यायचा असेल तर घेऊ शकतात.’ विखे पाटील यांनी सांगितले, ‘अपशब्द वापरल्याने आव्हाड यांचे निलंबन करण्यात आले आहे.
सभागृहात एकत्र असल्याने आम्ही त्यांच्यासोबत आज सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार घातलेला आहे. परंतु आव्हाड यांचे निलंबन रद्द होईपर्यंत जर त्यांचा कामकाजावर बहिष्कार असेल तर आम्ही त्यांना पाठिंबा देणार नाही. सोमवारपासून काँग्रेस विधानसभेच्या कामकाज भाग घेईल,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.