आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nationalist Congress Set Up Challenges Before The RPI

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रवादीच्या उमेदवार चाचपणीमुळे रिपाइंपुढे पेच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अमरावती लोकसभा मतदारसंघातून स्वतंत्रपणे उमेदवार उभा करण्याच्या हालचाली सुरू केल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपाइं (गवई गट) यांच्यातील पारंपरिक युती संकटात आली आहे.


अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीकरिता राखीव आहे. त्यामुळे निवडणुका घोषित होण्यापूर्वीच एखाद्या दमदार उमेदवाराच्या शोधात राष्ट्रवादी काँग्रेस आहे. यासाठी राष्ट्रवादीने काही उमेदवारांची चाचपणीही केली आहे. 2009 च्या निवडणुकीपर्यंत अमरावती लोकसभेची जागा काँग्रेसच्या वाट्याला होती. तोपर्यंत माजी राज्यपाल रा. सु. गवई यांनीच चारवेळा निवडणूक लढवली. मात्र, मागील निवडणुकीत काँॅग्रेसने ही जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात टाकली. त्या वेळी रिपाइंचे सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी निवडणूक लढवली. मात्र, आगामी निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावरच लढवावी, असा आग्रह राष्ट्रवादीने धरल्याने राष्ट्रवादी व त्यांच्यात बिनसले आहे.

मागील काही महिन्यांपासून रिपाइं आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील दरी वाढली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत अमरावतीची जागा आता राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. मात्र, 2014 ची लोकसभा निवडणूक रिपाइंने राष्ट्रवादीच्या ‘घड्याळ’ या चिन्हावर लढवावी, असा राष्ट्रवादीचा आग्रह आहे. त्या दृष्टीने आगामी लोकसभा निवडणूक ‘घड्याळ’ चिन्हावरच लढवली जाईल, असे राष्ट्रवादीच्या बैठकांमधून सातत्याने सांगितले जात आहे. तथापि, या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढण्यास रिपाइं तयार नाही. राष्ट्रवादीला शह देण्यासाठी रिपाइंनेही महाराष्ट्रात 13 लोकसभा मतदारसंघांत स्वतंत्रपणे उमेदवार उभे करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. रिपाइंचे सरचिटणीस राजेंद्र गवई यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत.


राकाँ पर्यायी उमेदवारांच्या शोधात
अमरावती लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसने कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच, असे आदेश पक्षाने दिल्याने राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आतापासूनच कामाला लागले आहेत. अटीतटीच्या परिस्थितीतही निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार पाहिजे म्हणून राष्ट्रवादीने उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. यासाठी जिल्ह्यातील काही नावांवर विचार सुरू आहे.


अजित पवारांनीच दिला शब्द
अमरावतीची उमेदवारी मला देण्याचे अजित पवारांनी तसेच वरिष्ठ नेत्यांनी फेब्रुवारी 2012 मध्ये मान्य केले आहे. यानंतरही कोणाला नाकारायचे असेल तर खुशाल नाकारावे. राष्ट्रवादीसाठी अमरावतीची जर एक जागा महत्त्वाची असल्यास महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या कोट्यातील 22 जागा आमच्यासाठीही महत्त्वाच्या आहेत. राजेंद्र गवई, सरटिणीस रिपाइं (गवई गट)