आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निसर्ग अन् महानोर अविभाज्य, एलकुंचवार यांचे मत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - निसर्ग आणि महानोर यांना एकमेकांपासून वेगळे करता येत नाही. निसर्ग आणि त्यांच्या जगण्यात एकतानता आहे, असे गौरवोद्गार सुप्रसिद्ध नाट्यलेखक प्रा. महेश एलकुंचवार यांनी रविवारी काढले.


निसर्गकवी ना. धों. महानोर यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल पॉप्युलर प्रकाशनातर्फे त्यांचा एलकुंचवारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. समीक्षक अक्षयकुमार काळे व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी महानोरांच्या ‘वाहाटूळ’ या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.


कविता ही बुद्धीने तपासून पाहण्याची गोष्ट नाही. तर अनुभवण्याची गोष्ट आहे. बहुतांश लोक कविता बुद्धीने तपासून पाहतात आणि आपापल्या परीने अर्थ लावतात. वास्तविक कविता ही अनुभवण्याचा प्रदेश आहे. आपण निसर्ग पाहायला जातो. आपण निसर्ग एकतर पाहतो वा घरात सजवतो. त्यात अनुभूती कुठेच नसते. महानोरांचे तसे नाही. कायम आनंदात असलेला निसर्ग त्यांच्या कवितेतून भेटतो. निसर्ग जगता जगता महानोर स्वत:च निसर्ग होऊन गेले आहे, अशा शब्दात एलकुंचवार यांनी महानोरांबद्दल गौरवोद्गार काढले.


मुळात समीक्षकांचे वर्गीकरण करणे मला मान्य नाही. अभ्यासाच्या दृष्टीने कदाचित असे वर्गीकरण होत असेल. पण प्रत्यक्षात अमुक कवी निसर्ग कवी आणि अमुक कवी सामाजिक जाणिवेचा असे कप्पे करणे मला मान्य नाही. असे वर्गीकरण अपुरे आणि त्या व्यक्तीला मर्यादा आणणारे असते, असे एलकुंचवार म्हणाले.


फ्रॉस्टच्या कवितेतील निसर्ग माणसासाठी आहे. तर वर्डस्वर्थची निसर्गावर कमालीची भक्ती आहे. पण महानोर निसर्गाशी एकरूप झाले आहेत, असे ते म्हणाले.