आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवनीत राणांचे नाव यादीत सापडेना !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - बोगस जात प्रमाणपत्राच्या आरोपावरून गुन्हा दाखल असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमरावती मतदारसंघातील उमेदवार नवनीत राणा यांच्यासमोरील अडचणीत नव्याने भर पडली आहे. देशातील कोणत्याच ठिकाणच्या मतदार यादीत त्यांचे नाव सापडत नसल्याचे रविवारी उघड झाले. त्यामुळे राणा यांचे नाव नेमक्या कुठल्या यादीत आहे, याची राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, प्रतिस्पर्धी उमेदवारांसह निवडणूक अधिकार्‍यांनीही शोधाशोध सुरू केली आहे.

पूर्वी मुंबईत वास्तव्याला असलेल्या नवनीत कौर सुमारे चार वर्षांपूर्वी बडनेराचे आमदार रवी राणा यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. त्यानंतर त्या अमरावतीच्या रहिवासी झाल्या. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून त्यांना राष्ट्रवादीने राखीव मतदारसंघात संधी दिली. मात्र, त्यांच्या जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप झाले. याच दरम्यान राणा यांनी आपले नाव बडनेरा विधानसभा मतदारसंघात नोंदवून घेतले. त्याचा उल्लेख लोकसभेच्या उमेदवारी अर्जातही केला. परंतु राणा यांनी प्रतिज्ञापूर्वक सादर केलेल्या भाग क्रमांकात त्यांचे नाव सापडले नाही. सोमवारी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून त्यात कोणत्याही मतदार यादीत राणांचे नाव असल्याचे सिद्ध झाले नाही तर त्यांची उमेदवारी अडचणीत येऊ शकते.

सर्व पुरावे जवळ आहेत
माझे मतदान लक्ष्मीनारायणनगरात आहे. नवनीत यांचेही तेथेच असेल. सर्व कागदपत्रे, पुरावे आपल्याजवळ आहेत. यादीत नाव सापडत नसेल, तर हा विषय गंभीरपणे पाहू. - रवी राणा, आमदार व नवनीत यांचे पती

अडसूळ, गवर्इंचे मतदान मुंबईत
निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांपैकी शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ आणि रिपाइंचे उमेदवार डॉ. राजेंद्र गवई या दोघांचीही नावे या मतदारसंघातील याद्यांत नाहीत. या दोघांचीही नावे मुंबईतील याद्यांमध्ये असल्यामुळे त्यांना अमरावतीत स्वत:साठीही मतदान करता येणार नाही.