आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NCP MP Tariq Anvar News In Marathi, Nagapur, Narendra Modi

केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात जनतेचा असंतोष वाढतोय : अन्वर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर-‘केंद्रातील मोदी सरकारच्या शंभर दिवसांच्या कामगिरीचे मूल्यमापन करणे घाईचे ठरणार असले, तरी या सरकारच्या विरोधात लोकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. सत्तारूढ होताना दिलेली आश्वासने या सरकारने अद्याप पाळलेली नाहीत,’ असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे महासचिव खासदार तारिक अन्वर यांनी नागपुरात बोलताना केला.

नागपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.'
अन्वर म्हणाले, लोकांच्या मोदी सरकारकडून खूप अपेक्षा आहेत. सरकारला शंभर दिवस झाले आहेत. त्यामुळे सरकारच्या कामगिरीवर भाष्य करणे घाईचे ठरणार असले, तरी या सरकारच्या विरोधात असंतोष वाढत आहे, असे चित्र देशभरात दिसत आहे. महागाईच्या नियोजनात यूपीएचे सरकार कमी पडले. मात्र, त्यानंतर आलेले मोदी सरकार अद्यापही महागाई कमी करू शकलेले नाही. देशाला भेडसावणाऱ्या महत्त्वाच्या प्रश्नांवरून लोकांचे लक्ष हटवण्यासाठी भाजप आणि संघ परिवार धार्मिक सौहार्द बिघडवण्याचे प्रयत्न करत आहे. वाजपेयी सरकारच्या काळातही वातावरण एवढे गढूळ झाले नव्हते, असा आरोप त्यांनी केला.

लव्ह जिहादच्या माध्यमातून विशिष्ट समाजाला लक्ष्य करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्यक्षात असा कुठलाही प्रकार नाही. भाजपच्या अनेक मुस्लिम नेत्यांनी हिंदू महिलांशी विवाह केला आहे. त्यात गैर काहीही नसले, तरी देशात लव्ह जिहाद सुरू असल्याचा भ्रामक प्रचार मुद्दाम केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी १५ वर्षे जुनी असल्याने यापुढेही आम्ही साथ-साथ राहू, असा निश्वास व्यक्त करून खासदार अन्वर म्हणाले की, २००९ मध्ये तत्कालीन लोकसभा निवडणुकीतील कामगिरीच्या आधारे जागावाटप झाले होते. तीच मागणी आम्ही या वेळीदेखील केली आहे. काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा प्रश्नच उदभवत नसून, एका विचारधारेतून आम्ही वेगळे झालो होतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. या वेळी अन्न नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांच्यासह राष्ट्रवादीचे स्थानिक नेते उपस्थित होते.

गुजरात मॉडेल आहे तरी काय? नरेंद्रमोदी यांनी धार्मिक आधारावर ध्रुवीकरण करून गुजरातमध्ये सत्ता चालवली. पक्षांतर्गत विरोधकांनाही त्यांनी संपवले. गुजरातमध्ये जे केले तेच देशात राबवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. गुजरात मॉडेल हेच आहे, असा आरोपही खासदार अन्वर यांनी केला.