आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NDA Government Will Come In 2014, Gopinath Munde Expressed Confidence

2014 मध्ये केंद्रात एनडीएची सत्ता येणार, गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्त केला विश्‍वास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या निकालांवरून देशात परिवर्तनाची लाट वाहत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 2014 मध्ये जनता यूपीए सरकारला त्यांची जागा दाखवणार असून, केंद्रात एनडीएची सत्ता येणार असल्याचा विश्वास भाजपचे राष्‍ट्रीय नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्त केला.
नुकत्याच झालेल्या चार राज्यांच्या निवडणुकीत भाजपला भरघोस यश मिळाले आहे. भाजपच्या तुलनेत काँग्रेसच्या वाट्याला केवळ 25 टक्के जागा आल्या. काँग्रेसचे पूर्णपणे पानिपत झाले. राज्यात पंधरा वर्षे आणि केंद्रात 10 वर्षे सत्ता उपभोगत असताना राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आताच नेतृत्व दुबळे असल्याचा साक्षात्कार का झाला? असा सवाल मुंडे यांनी केला. शरद पवार हे संधीसाधू असून, ते नेहमी कुंपणावर बसल्याची भूमिका निभावतात. काँग्रेसचे खरे मित्र असते, तर त्यांनी यापूर्वीच काँग्रेसला सावध केले असते. चार राज्यांची निवडणूक ही परिवर्तनाची लाट असून, 1977 च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली.
राजीव शुक्ला प्रकरण महाराष्‍ट्र सरकारची चूक
केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांना जमीन देऊन महाराष्‍ट्र सरकारने मोठी चूक केली आहे. प्रकरण उघडकीस येताच शुक्ला यांनी सरकारला जमीन परत करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पत्र आपल्याला आजच प्राप्त झाले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दबावाला बळी न पडता शुक्लांकडून जमीन परत घेऊ नये, असे त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.
गोपीनाथ मुंडे हेच संधिसाधू : नवाब मलिक
महाराष्‍ट्राच्या काही नेत्यांना दिल्लीत पाठवण्यात आले आहे. दिल्लीमध्ये लोकसभेचे अधिवेशन सुरू असताना केवळ प्रसिद्धीसाठी भाजपचे खासदार गोपीनाथ मुंडे विधानसभेच्या परिसरात फिरत आहेत. आमचे नेते शरद पवार यांच्यावर आरोप करणारे गोपीनाथ मुंडे हेच संधिसाधू असल्याचा आरोप राष्‍ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व आमदार नवाब मलिक यांनी केला. त्यामुळे येणा-या काही दिवसांत राष्‍ट्रवादी आणि भाजपमधील शीतयुद्ध आणखी रंगण्याची चिन्हे आहेत.