आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवे काही: ‘स्वराली’ने महिलांना दिले संगीताचे व्यासपीठ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ‘जमाना बदल गया है’ हे वाक्य केवळ जाहिरातीत चांगले वाटते. अजूनही समाजात पुरुष व महिलांच्या बाबतीत भेदाभेद पाळला जातो. पुरुषांच्या तुलनेत आजही महिलांना संधी मिळत नाही हे माझ्याकडे शिकायला येणा-या महिलांच्या बोलण्यातून लक्षात आले. तिथूनच मनात फक्त आणि फक्त महिलांसाठी असलेला ग्रुप सुरू करण्याचा विचार रुजला, आणि ८ ऑगस्ट १९९३ रोजी ‘स्वराली’ची स्थापना झाली’, नंदिनी सहस्रबुद्धे यांनी ‘दिव्य मराठी’जवळ हा प्रवास कथन केला. संगीत शिकलेल्या, पण संसारात गुंतल्यानंतर कारणपरत्वे ज्यांची आवड जोपासली जात नाही, अशा महिलांना पुन्हा या क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहन देऊन त्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘स्वराली’ची स्थापना केल्याचे त्या सांगतात.

‘स्वराली’ हा महाराष्ट्रातील पहिला सतार वादक आणि गायकांचा ग्रुप आहे. अलीकडे नाशिक येथे आणखी एक ग्रुप स्थापन झाला. लग्न झाल्यावर महिलांना पहिली दहा-बारा वर्षे आपल्या आवडी- निवडींसाठी फारसा वेळ देता येत नाही. अशा महिलांना एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी नंदिनी यांनी ‘स्वराली’ ग्रुप स्थापन केला. नंदिनी सहस्रबुद्धे या माहेरच्या सुनीता बापट. ३० मे १९७० रोजी त्यांचा विद्याधर सहस्रबुद्धेंशी विवाह झाला. मी स्वत:ही लग्नानंतर १९७५ पासून नागपूरच्या बुटी संगीत महाविद्यालयातून सतार शिकायला सुरुवात केली. १९९३ मध्ये सतार हा विषय घेऊन मुंबईच्या एसएनडीटी महाविद्यालयातून एम. ए. केले. हेमा पंडित, नंदा सोमण या मैत्रिणींना सोबत घेऊन ‘स्वराली’ची स्थापना केली.

आजवर दोनशे कार्यक्रम
आज ग्रुपमध्ये २८ महिला आहेत. यापैकी १६ सतार वादन करतात. व्हायोलिन ०५, हार्मोनियम ०२, तबला ०४ व एक बासरी वादक आणि उज्ज्वला गोकर्ण या मायनर वाजवतात. मुरादाबाद, बिलासपूर, रायपूर, दिल्ली, पुणे, अक्कलकोट आदी ठिकाणी आतापर्यंत ‘स्वराली’चे २०० कार्यक्रम झाले. प्रत्येक ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘स्वराली’चा प्रत्येक कार्यक्रम एक तासाचा असतो. यात प्रत्येक धून १५ मिनिटांची असते. प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात वृंदवादनाने करणे हे या ग्रुपचे वैशिष्ट्य आहे.

गायिकांचे दोन गट
‘स्वराली’ दरवर्षी एक थीम घेऊन मोठा कार्यक्रम करते. सकाळचे राग, सायंकाळचे राग अशा विविध वेळच्या रागांवर आधारित कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. गाण्याच्या दाेन ग्रुपमध्ये सुमारे २५ महिला आहे. त्यातील १० सुगम संगीत आणि १५ शास्रीय संगीत गातात. प्रत्येकीला संधी दिली जाते. आम्ही पहिला कार्यक्रम गदिमांवर केला. २०१० मध्ये कलर्स वाहिनीवरील इंडियाज गॉट टॅलेंट या रिअ‍ॅलिटी-शोच्या पहिल्या सहामध्ये ‘स्वराली’चा चमू पोहोचला. त्यानंतर अनेक वाहिन्यांचे बोलावणे आले; पण एवढा मोठा ग्रुप घेऊन राहणे सोपे नव्हते. म्हणून रिअ‍ॅलिटी-शोमध्ये गेलो नाही, असे सहस्रबुद्धे यांनी सांगितले.

वेबसाइट सुरू : ‘स्वराली’ची स्थापना गुढीपाडव्याला झाली. २०१४ च्या गुढीपाडव्याला २१ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त वेबसाइटचे लोकार्पण करण्यात आले. Swaralisangeet.org या वेबसाइटवर संस्थेची माहिती आहे.