नागपूर - मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात १२ मंत्री घेण्यात येणार आहेत. त्या वेळी मराठवाड्याला न्याय देऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मराठवाड्याला मंत्रिमंडळात फारसे स्थान न मिळाल्याने नाराजी आहे, याकडे लक्ष वेधले असता त्यांनी हे स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे मराठवाड्यातील भाजप आमदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पहिल्यांदाच आमदार झालेल्यांना मंत्रिपद न देण्याचे भाजपचे धोरण आहे. भाजपचे यंदा मराठवाड्यात सहाच आमदार दुस-यांदा निवडून आले आहेत. त्यात पंकजा मुंडे, बबनराव लोणीकर, गंगापूरचे प्रशांत बंब, भीमराव धोंडे, सुधाकर भालेराव व निलंग्याचे संभाजी निलंगेकरांचा समावेश आहे. पैकी मुंडे व लोणीकर मंत्रिमंडळात आहेतच. धोंडे हे फार पूर्वी काँग्रेस आमदार होते, तर पूर्वाश्रमीचे भाजप कार्यकर्ते बंब मागील वेळी अपक्ष आमदार होते. मराठवाड्याला भाजपच्या कोट्यातून आणखी दाेन राज्य मंत्रिपदे मिळण्याचे संकेत असून त्यात निलंगेकर व बंब या दोघांना संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे.