आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nitin Gadkari And Anjali Damania News In Marathi, Divya Marathi

श्रीमंतीत गडकरींसह आपच्या दमानिया खास उमेदवार, तर कॉंग्रेसचे मुत्तेमवार सर्वात गरीब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणारे भाजप नेते नितीन गडकरी आणि आम आदमी पार्टीच्या नेत्या अंजली दमानिया हे दोन्ही उमेदवार श्रीमंतीत तुल्यबळ ठरले आहेत. या दोन उमेदवारांच्या तुलनेत काँग्रेसचे विद्यमान खासदार विलास मुत्तेमवार हे सर्वात गरीब उमेदवार ठरले आहेत.


प्रतिज्ञापत्रात गडकरी यांनी अंदाजे 20 कोटी तर दमानिया यांनी 19 कोटी रुपयांच्या मालमत्तेची माहिती उघड केली आहे, तर मुत्तेमवार यांनी आपल्याकडील अडीच कोटी रुपयांच्या संपत्तीची माहिती दिली आहे. गडकरी यांनी 2012-13 या आर्थिक वर्षात आयकर खात्याकडे स्वत:च्या आणि कुटुंबाच्या नावावर एकूण 21 लाख 45 हजारांचे वार्षिक उत्पन्न दाखविले आहे. संपत्तीची माहिती देताना गडकरी यांनी त्यांच्याकडे एकूण 2 कोटी 52 लाख रुपयांची चल संपत्ती दाखविली आहे. त्यात पत्नी कांचन, मुलगी केतकी तसेच वडिलोपार्जित संपत्तीचाही समावेश आहे. गडकरी कुटुंबाची 14 बँकांमध्ये खाती असून त्यात सुमारे 27 लाखांच्या ठेवी आहेत.


याशिवाय गडकरी कुटुंबीयांची पूर्ती, जीएमटी मायनिंग अँड एनर्जी, यश अ‍ॅग्रो एनर्जी, वर्धा साखर कारखाना, सेनीन टूर्स अँड ट्रॅव्हल्स व अन्य कंपन्यांमध्ये शेअर्स, बॉण्ड्स, म्युचुअल फंड्सच्या स्वरूपात सुमारे 29 लाखांची गुंतवणूक आहे. त्यांच्याकडे असलेल्या वाहनांमध्ये अ‍ॅम्बेसेडर, दोन इनोव्हा, आऊटलँडर, होंडा ब्राव्हो, फोक्सवॅगन जेटा या चारचाकी वाहनांसह अ‍ॅक्टिव्हा मोपेड या दुचाकी वाहनांचा समावेश आहे. याशिवाय गडकरी कुटुंबीयांकडे सुमारे दोन किलो सोन्याचे दागिने आहेत.


गडकरी यांनी आपल्याकडील सुमारे साडेसतरा कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तेचे विवरणही दिले आहे. त्यात स्वत: गडकरी यांच्या नावावर मुंबईत वरळी येथे पावणेचार कोटी रुपये किमतीचा फ्लॅट (1050 चौरस फुटाचा), पत्नीच्या नावावर नागपूर जिल्ह्यात धापेवाडा येथे 15 एकर जमीन (किंमत 5 7 लाख 57 हजार रुपये), धापेवाडा येथे वडिलोपार्जित 14 एकर जमीन (किंमत 96 लाख 95 हजार), महाल परिसरात उपाध्ये मार्गावर अंदाजे 5 कोटी रुपये किमतीचा वाडा तसेच 1 कोटी 85 लाख रुपये किमतीचे घर, धापेवाडा येथे 24 लाख रुपये किमतीचे वडिलोपार्जित घर तसेच पत्नीच्या नावे 38 लाख रुपये किमतीच्या घराचा प्रामुख्याने समावेश आहे.
गडकरी कुटुंबीयांवर एकूण 1 कोटी 90 लाख रुपयांचे कर्ज देखील आहे.


अशी मालमत्ता
गडकरी यांच्याशी मुकाबला करीत असलेल्या आम आदमी पार्टीच्या उमेदवार अंजली दमानिया या देखील संपत्तीत खास उमेदवार ठरल्या आहेत. दमानिया यांनी 19 कोटी रुपयांच्या संपत्तीची माहिती सादर केली आहे. त्यात 15 कोटी रुपयांची स्थावर तर 4 कोटी रुपयांच्या चल संपत्तीचा समावेश आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातून रिंगणात असलेले काँग्रेसचे विद्यमान खासदार विलास मुत्तेमवार हे आपल्या प्रमुख प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत सर्वात गरीब उमेदवार ठरले आहेत. त्यांनी 2 कोटी 67 लाख रुपये किमतीच्या संपत्तीची माहिती उघड केली आहे.