आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nitin Gadkari Claims That One Big Political Leader Had Approached Him

गडकरी म्‍हणतात माझ्यामुळे यूपीए सरकार वाचले!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकार पाडण्यासाठी एक ज्येष्ठ अनुभवी नेता कायम आपल्या संपर्कात होता. मात्र, सरकार पाडण्याची त्याची योजना आपण फेटाळल्याने यूपीए सरकार वाचले. अन्यथा आज वेगळे चित्र दिसले असते, असा गौप्यस्फोट भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी शुक्रवारी केला.

गडकरी पक्षाचे राष्‍ट्रीय अध्यक्ष असताना त्या कार्यकाळात हा बडा नेता कायम आपल्या संपर्कात होता, असे गडकरी म्हणाले. मात्र, त्या तगड्या नेत्याचे नाव किंवा त्याच्या पक्षाची ओळख सांगण्यास त्यांनी नकार दिला. गुरुवारी सायंकाळी एका कार्यक्रमात गडकरी बोलत होते. ‘मैं मर्द का बच्चा हूं.... जे करायचे ते समोरासमोर करीन. कोणीही असो, त्याच्यावर कोणत्याही परिस्थितीत पाठीमागून वार करणार नाही,’ असे ते म्हणाले.

‘माझी सदसद्विवेकबुद्धी जागृत आहे. शिवाय माझा वेगळा कोणताही अजेंडा नाही,’ असेही गडकरी यांनी नमूद केले. आपल्या पक्षाध्यक्षपदाच्या कार्यकाळात झालेले आरोप आणि घडामोडींचा उल्लेख करून ते म्हणाले, ‘मी काहीही चुकीचे केलेले नाही.’ गडकरी यांच्या पूर्ती गु्रपमध्ये कथितरीत्या बेनामी गुंतवणूक झाल्याच्या आरोपावरून प्राप्तिकर विभागाने त्यांची चौकशी केली होती.

‘तो’ नेता आहे तरी कोण?
गडकरींचे हे वक्तव्य विविध वृत्तवाहिन्यांवर प्रसिद्ध झाल्यानंतर यूपीए सरकार पाडण्याची क्षमता असलेला हा नेता आहे तरी कोण, याबद्दल प्रत्येकाची उत्सुकता ताणली गेली. मात्र, त्या नेत्याचे नावच गडकरींनी घेतले नसल्याने तर्क-वितर्क मांडले जात आहेत. हा नेता राजकारणातील फार मोठे प्रस्थ असल्याचे सांगून तो एकटा माणूस कोणत्याही क्षणी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए-2 सरकार पाडू शकतो, असे वर्णन गडकरींनी केले.