आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nitin Gadkari News In Marathi, BJP,Nagpur Lok Sabha Constituncy, Election

नागपुरात मला सर्वच राजकीय पक्षांकडून समर्थन व सहकार्य मिळेल - नितीन गडकरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - नागपुरात मला सर्वच राजकीय पक्षांकडून समर्थन व सहकार्य मिळत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत यशाची शंभर टक्के खात्री असल्याचा दावा भाजप नेते नितीन गडकरी यांनी शनिवारी येथे केला.
गडकरी यांनी शनिवारी नागपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी, संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून गडकरी आणि शिवसेनेचे रामटेकचे उमेदवार कृपाल तुमाने हे संयुक्त मिरवणुकीने जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. या वेळी मोठ्या संख्येने कार्यकर्तेही उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर माध्यमांशी बोलताना गडकरी यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. मागील 35 वर्षांपासून नागपुरात सार्वजनिक क्षेत्रात काम करतो आहे. लाखो लोकांशी माझा संपर्क आहे. मी लोकांसाठी काम करू इच्छितो. त्यामुळे आपल्याला नागपूरकरांचे पूर्ण सहकार्य मिळेल, असा विश्वास असल्याचे गडकरी म्हणाले. शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना खासदार विलास मुत्तेमवार यांनी मी आठव्यांदा निवडणूक लढतोय, तर गडकरी प्रथमच निवडणूक लढत असल्याने त्यांचे कुठलेही आव्हान नाही, असा दावा केला होता. त्यावर बोलताना गडकरी म्हणाले की, त्यांना पराभव समोर दिसत असल्याने त्यांचा संयम ढासळला आहे. माझी त्यांना सहानुभूती व शुभेच्छा आहेत. राष्ट्रीय स्तरावर भाजपमध्ये कुठलेही मतभेद नसल्याचे सांगताना गडकरी यांनी एकाच मतदारसंघातून अनेक नेत्यांनी लढण्याची इच्छा व्यक्त केल्यास, अशी परिस्थिती निर्माण होते, याकडे लक्ष वेधले.


भाजपचे शक्तिप्रदर्शन
गडकरी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने भाजपने कार्यकर्त्यांचे शक्तिप्रदर्शन घडवून आणले. गडकरी आणि तुमाने यांच्या संयुक्त मिरवणुकीतील गर्दीने संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यानच्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.