आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूर - भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रथमच नागपूरमध्ये आलेले नितीन गडकरींचे आक्रमक रुप कार्यकर्त्यांना पाहायला मिळाले.
काँग्रेस आणि युपीए सरकारने प्राप्तीकर विभागाला हाताशी धरुन माझ्या विरुद्ध षडयंत्र सुरु केले आहे. असे सांगत गडकरींनी प्राप्तीकर विभागाचे अधिकारी भाजपचे सरकार आल्यावर कुठे जातील असा सवाल केला.
भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष असल्यामुळे काही शिस्त पाळावी लागत होती, आता मात्र मी मोकळा झालो आहे. असे म्हणत दिल्ली आणि महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांचा भ्रष्टाचार आता बाहेर काढणार असा इशारा त्यांनी दिला. काँग्रेसमध्ये एकाच घराण्याचे चालते, सोनिया गांधी सांगतिल तेवढेच होते. अशी टीका करताना त्यांनी काँग्रेसमध्ये एकच मालकीन आहे आणि बाकी सगळे नोकर असल्याचे म्हटले.
अध्यक्षपद नसले तरी भाजपमध्ये सक्रीय राहाणार असे सांगून त्यांनी संघर्ष हा माझ्या स्वभावाचा स्थायीभाव आहे. त्यामुळे संघर्षाला घाबरत नाही. यापुढे काँग्रेसला देशातून उखडून फेकणे हा एकमेव उद्देश राहाणार आहे, असे ते म्हणाले.
गडकरींच्या पूर्ती समुहातील कथीत घोटाळ्यांची प्राप्तीकर विभाग सध्या चौकशी करीत आहे. त्यांच्या अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब होणार त्याच्या एक दिवस आधी मुंबईत पूर्तीशी संबंधीत नऊ ठिकाणांवर प्राप्तीकर विभागाने छापे टाकले आणि त्यांना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. अन्यथा गडकरींच्या अध्यक्षपदाच्या दुस-या टर्मचे पक्षातील सर्व अडथळे त्यांनी पार केले होते. मात्र, या छाप्यांनी त्यांना अडचणीत आणले.
नागपूरमधील स्वागताने भारावून गेलेल्या गडकरींनी आगामी निवडणूकीत भाजपच सत्तेवर येईल असा विश्वास व्यक्त करुन, काँग्रेसची नाव आता हेलकावे खात आहे, २०१४च्या निवडणुकीत ती बुडणार आहे. आगामी निवडणुकीत भाजप सत्तेवर आल्यानंतर काँग्रेसच्या इशा-यावर काम करणारा प्राप्तीकर विभाग कुठे जाईल असा सवाल केला. गडकरींच्या स्वागताची नागपूर भाजपने जय्यत तयारी केली होती. भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगुंटीवार, आमदार देवेंद्र फडणवीस यांच्यासह शेकडो कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर हजर होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.