नागपूर - दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या प्रश्नांवर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारला दणदणीत मोर्चाची सलामी देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न सपशेल फसला. शेतक-यांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह पक्षाच्या बड्या नेत्यांना नामुष्की सहन करावी लागली. त्यामुळे विधिमंडळासमोर धरणे देऊन काँग्रेसनेत्यांनी आंदोलन साजरे केले.
दीक्षाभूमीसमोरून सकाळी ११ वाजता मोर्चा निघणार होता. मात्र १२ वाजेपर्यंत शेतकरी तर नाहीच पण कार्यकर्तेही जमले नव्हते. त्यामुळे संयोजक नितीन राऊत, विलास मुत्तेमवार, अनिस अहमद आदी नेते चिंताक्रांत झाले होते. कार्यकर्ते जमवण्यासाठी धावपळ सुरू झाली.
दरम्यान, याच वेळी काँग्रेसचे आमदार अमर काळे यांचे निलंबन रद्द करण्याच्या मागणीसाठी एक हजार कार्यकर्त्यांची दिंडी दीक्षाभूमीसमोर पोहोचली. या दिंडीतील गर्दीचेच अखेर माेर्चात रुपांतर करण्यात आले आणि पक्षाची कशीबशी लाज राखली. दोनच्या सुमारास हा मोर्चा विधान भवनाच्या दिशेने निघाला. पाेलिसांनी अडविल्यानंतर माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे गटनेते राधाकृष्ण विखे पाटील, उपगटनेते विजय वडेट्टीवार या नेत्यांची मोर्चापुढे भाषणे झाली.