आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now Congress Nationalist Cogress Make Realliance

युतीपाठोपाठ आता आघाडीचीही ‘घडी’! अधिवेशनासाठी दोन्ही काँग्रेस एकत्र येणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - भाजपने शिवसेनेशी घरोबा करून राष्ट्रवादीशी दुरावा केल्याचे चित्र असतानाच दोन्ही काँग्रेसने एकमेकांशी संधान साधून पुन्हा एकदा आघाडीची घडी बसवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची सोमवारी रात्री बैठक झाली आणि त्यात हा निर्णय झाला. अधिवेशनासाठी एकत्र येण्याचा निर्णय झाल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी म्हटले आहे, तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीदेखील त्यास दुजोरा दिला आहे. विरोधी पक्षनेतेपदावरून देखील उभय पक्षांमध्ये तोडगा दृष्टिपथात आला असल्याची माहिती काँग्रेसमधील विश्वसनीय सूत्रांनी दिली. मंगळवारी या मुद्द्यावर पुन्हा बैठक होणार आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची पहिलीच संयुक्त बैठक सोमवारी रात्री विधान परिषद उपसभापतींच्या निवासस्थानी पार पडली. काँग्रेस नेत्यांनी या बैठकीला चहा-पानाची बैठक असे नाव दिले असले तरी ती पूर्वनियोजितच होती, असे सूत्रांनी सांगितले. काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, गटनेते विखे पाटील तर राष्ट्रवादीच्या वतीने अजित पवार आणि सुनील तटकरे या वेळी उपस्थित होते.

भविष्यासाठी एकजूट : विरोधकांमध्ये फाटाफूट असल्याचे चित्र अधिवेशनात निर्माण झाले आहे. त्याचा अप्रत्यक्ष फायदा सत्ताधारी उठविण्याच्या तयारीत आहेत. दोन्ही काँग्रेसच्या भवितव्याच्या दृष्टीने ही बाब फायदेशीर नसल्याचे लक्षात आले.

आक्रमक होणार, रोज रणनीती ठरणार अधिवेशनात एकत्र येण्याचा तसेच सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या नेत्यांनी घेतला. चारही नेत्यांनी रोजच्या रोज एकत्र येऊन पुढच्या दिवसाची रणनीती आखायची, असे ठरवण्यात आले आहे.
दुष्काळावर आज चर्चेची मागणी करणार
विधानसभेत मंगळवारी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून दुष्काळ व शेतकरी आत्महत्यांच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी करण्याचा निर्णयही बैठकीत झाला. परिषदेत अन्य नियमान्वये अशी चर्चा घेण्याचा निर्णय सभापतींनी यापूर्वीच जाहीर केला आहे.

विरोधी पक्षनेतेपदी विखे की आबा ?
विरोधी पक्षनेतेपदावर मंगळवारच्या बैठकीत अंतिम तोडगा निघण्याचे संकेत आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसचे राधाकृष्ण विखे, तर परिषदेतील नेतेपदासाठी धनंजय मुंडे यांचे नाव पुढे आणण्याचा तोडगा निघू शकतो. दरम्यान, राष्ट्रवादी आर. आर. पाटील यांचे नाव पुढे करणार असल्याचे राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले आहे.

दोन्ही काँग्रेसकडून एकजुटीला दुजोरा
अधिवेशनात एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक दिवसाची रणनीती संयुक्तपणे ठरवू. विरोधी पक्षनेतेपदाच्या मुद्द्यावर तोडगा निघू शकतो. आणखी चर्चा अपेक्षित आहे.
माणिक ठाकरे, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

दुष्काळ, शेतक-यांच्या आत्महत्यांच्या मुद्द्यांवर आम्ही एकत्र राहण्याचे ठरवले आहे. एकत्रितपणे रणनीती ठरवली जाईल. असे असले तरी विरोधी पक्षनेतेपदासाठीही राष्ट्रवादी मंगळवारी दावा करील.
सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी

७५ दिवसांनंतर एकीकरणाच्या हालचाली
विधानसभा निवडणुकीपूर्वी २५ सप्टेंबर रोजी भाजप-शिवसेनेतील युती संपुष्टात आली. त्याच दिवशी सायंकाळी दोन्ही काँग्रेसमध्येही फाटाफूट झाली होती. आता ७५ दिवस वेगवेगळे वावरल्यानंतर आघाडीच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. फायद्याची राजकीय गणिते मांडूनच ही रणनीती आखली जात असल्याचे विश्लेषकांचे मत आहे.