नागपूर - केवळ शेतकरी व जनतेच्या प्रश्नावर काँग्रेस- राष्ट्रवादी हे जुने मित्र एकत्र आले असले तरी त्यांच्यातील कुरघोडीचे राजकारण मात्र अजून संपलेले नाही. काँग्रेसला साथ देण्याची घोषणा करतानाच राष्ट्रवादीने विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून आता काँग्रेसनेही विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. विधानसभेत काँग्रेसचे ४२, तर राष्ट्रवादीचे ४१ सदस्य आहेत. मात्र, चार मित्रपक्षांचा पाठिंबा असल्याचा राष्ट्रवादीचा दावा आहे.
विधान परिषद पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादीतर्फे धनंजय मुंडे यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. त्याबाबतचा प्रस्तावही सभापतींकडे सादर करण्यात आला आहे. मात्र, बुधवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी काँग्रेस उमेदवाराच्या नावाचा प्रस्ताव सादर केल्याचे सभापती शिवाजीराव देशमुख यांनी सांगितले. त्यावरून सभागृहात चर्चाही झाली.
राष्ट्रवादीचे हेमंत टकले यांनी कामकाज विरोधी पक्षनेत्याविना सुरू असल्याचे लक्षात आणून दिले. तसेच पक्षनेता लवकरात लवकर जाहीर करण्यात यावा, अशी मागणीही केली. त्यावर सभापतींनी काँग्रेसनेही अर्ज दिल्याचे सांगितले. राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे राष्ट्रवादी सरकारमध्ये आहे की विरोधी पक्षात, हे जाणून घेण्याची इच्छा आहे, असे जोगेंद्र कवाडे म्हणाले.
त्यावर दुखावलेल्या तटकरेंनी आम्ही जनतेच्या प्रश्नावर विरोधी पक्षाची भूमिका बजावत असल्याचे सांगितले.आता शिवसेना सोबत आल्याने सरकार बहुमतात आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी विरोधी पक्ष राहील, असे स्पष्टीकरणही तटकरे यांनी दिले. कवाडेंनी कोणाच्या सांगण्यावरून प्रश्न विचारला असेल, असे टोमणाही मारला. त्यावर कवाडेंनीही
आपण कोणाच्या सांगीवांगीवरून बोलणारे प्राध्यापक नसल्याचे सांगितले.
महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनीही विरोधी पक्षनेतेपदाला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने ते लवकर घोषित करण्यात यावे, असे सांगितले. त्यावर सभापतींनी याबाबत अचूक निर्णय लवकरात लवकर घेऊ, असे सांगत विषय संपवला.
निवडीचे निकष कोणते?
परिषदेत राष्ट्रवादीचे २८ सदस्य आहेत. त्यामुळे आमचे संख्याबळ जास्त आहे. २१ सदस्य असलेल्या काँग्रेसने दुसरे पत्र दिले. मग विरोधी पक्षनेता निवडीचे नेमके निकष तरी कोणते, हे स्पष्ट करण्यात यावे, असे सुनील तटकरे म्हणाले.