आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवाण-घेवाणीतून अक्षय आनंदाचा ठेवा!, नागपुरातही फ्री स्टोअरचा देशी अवतार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - देणा-याने देत जावे, घेणा-याने घेत जावे, घेता घेता एक दिवस, देणा-याचे हात घ्यावे!
कविवर्य विंदांनी या काव्यपंक्तींतून व्यक्त केलेली दातृत्वाची भावना अंगीकारण्यासाठी अाता तरुणाई पुढे सरसावली अाहे. एखाद्या वस्तूचा वापर करून झाल्यावर ती गरजूंसाठी कुठेतरी ठेवून देण्याची व त्या माध्यमातून विल्हेवाट लावण्याची ‘फ्री स्टोअर’ नामक संकल्पना पाश्चात्त्य जगात रूढ आहे. मात्र, या संकल्पनेतील कोरडेपणाची भावना बाजूला सारून आपुलकीच्या भावनेतून वस्तू शेअर करण्याची जाणीव रूढ करायला लावणारा फ्री स्टोअरचा ‘देशी अवतार’ सध्या नागपूर, ठाणे, पुण्यासह अादी शहरांमध्ये मूळ धरू लागला आहे.

नागपुरातील रामदासपेठेत या उच्चभ्रू वसाहतीतील दगडी पार्कात सहा महिन्यांपासून फ्री स्टोअरचे आयोजन केले जात अाहे. विद्यार्थी, डॉक्टर, अभियंता, आर्किटेक्टसह अशा विविध क्षेत्रांतील तरुणांचा गट यासाठी पुढाकार घेताेय. एका ठरावीक दिवशी काही लोक अापल्याला गरज नसलेल्या वस्तू घेऊन पार्कात येतात. तेथे त्या व्यवस्थित मांडल्या जातात. त्या बघायला आणि गरजेनुसार घेऊन जायलादेखील लोक येतात. मात्र या देवाणघेवाणीत कुठलाही अार्थिक व्यवहार नसताे. यानिमित्तशने जमलेल्या लोकांशी संवाद साधून आपल्या गरजेची वस्तू बिनधास्तपणे घेऊन जावी. असा हा ‘फ्री स्टोअर’चा मामला आहे. हा उपक्रम पाहून पार्कातील लाेकांना अप्रूप वाटायचे; पण नंतर त्यातील गंमत कळल्यावर लोक स्वत:हून वस्तू द्यायला-घ्यायला पुढे येऊ लागले. कपडे, सीडीज, कॅसेट्स, पुस्तके, मुलांची खेळणी, शो पिसेस, इलेक्ट्रॉनिक उपकरणे अशा अनेक वस्तू या ठिकाणी जमा हाेतात. सोशल मीडियाचा आधार घेऊन या उपक्रमाचा प्रसार व प्रचार केला जात अाहे.

संवाद वाढवण्याचे प्रयत्न
‘भौतिक जगात लोकांनी स्वत:मध्ये गढून न राहता एकमेकांना भेटावे. एकमेकांना जाणून घेण्याचे, संवाद वाढवण्याचे प्रयत्न व्हावेत. गरजेच्या वस्तू, विचार शेअर व्हावेत. शेअरिंगची संस्कृती वाढीस लागावी हाच या उपक्रमामागील उदात्त हेतू अाहे. याला आम्ही देवाणघेवाण मानत नाही. कारण या देवाणघेवाणीचे कुठलेही रेकॉर्ड ठेवले जात नाहीत. अलीकडेच्या इव्हेंटमध्ये आम्ही या उपक्रमाला मनोरंजनाचीही जोड देण्याचा प्रयत्न केला,’ असे अायाेजक रिद्धी साबू व रिद्धी सांगतात.

शेअरिंग वाढावी
ही व्यापक चळवळ व्हावी. शेअरिंग वाढीस लागणे महत्त्वाचे.. अशी भावना ठाण्यात ही संकल्पना रुजवणारा व सध्या उदयपूर विद्यापीठात शिकणारा पार्थ दवे याने व्यक्त केली. वस्तू देण्यात जसा संकोच आड येत नाही. तसाच गरजेची वस्तू घेण्यातील संकोच दूर व्हावा यासाठीही आमचे प्रयत्न असतात, असे पार्थ सांगतो.