आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता पंतप्रधानांनीच पुढाकार घ्यावा, माओवाद्यांसोबत शांततेसाठी अग्निवेश यांचा प्रस्ताव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - केंद्र सरकारच्या विश्वासघातकी धोरणामुळे सरकार आणि माओवादी संघटना यांच्यातील शांतता प्रक्रिया सुरू होऊ शकलेली नाही. आता पंतप्रधानांनीच यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आर्य समाजाचे नेते व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले.


ते म्हणाले की, गृहमंत्री चिदंबरम् यांनी केलेल्या आवाहनानुसार आपण शांतता प्रक्रियेसाठी प्रयत्न केले. माओवादी संघटनांनीही तयारी दर्शविली, पण 2010 मध्ये आदिलाबादच्या जंगलात माओवादी नेता चेरकुरी राजकुमार उर्फ आझाद व पत्रकार हेमचंद्र पांडे या दोघांचे एन्काउंटर झाले. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्णपणे थांबली. आझाद व पांडे यांना नागपूरातच ठार करून जंगलात चकमक झाल्याचा देखावा केल्याचाही माओवादी संघटनांचा आरोप आहे. हे प्रकरण पूर्णपणे संशयास्पद आहे. त्यामुळे या घटनेची किमान न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी आपण तत्कालिन केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम् यांच्याकडे केली होती, मात्र त्यांनी त्यास नकार दिला.


पंतप्रधानांनी चौकशीचे दिलेले आश्वासन पाळले नाही. या घटनेला तीन वर्षे उलटूनही सत्य बाहेर आलेले नाही. सरकारने विश्वासघात केला आहे. शांतता प्रक्रिया सुरू झाली असती तर आतापर्यंत झालेला रक्तपात टळला असता, असेही
स्वामींनी नमूद केले.


मी समर्थक नाहीच
माओवाद्यांच्या हिंसाचाराचा आपण नेहमीच विरोध केला आहे. त्यामुळे आपण त्यांचे समर्थक नाहीतच. मानवतावादी दृष्टीकोनातून हिंसाचार टाळण्याचे आपले प्रयत्न आहेत. केंद्र सरकारची इच्छा असेल तर आताही शांतता प्रक्रिया सुरू होऊ शकते. मात्र आता त्यासाठी पंतप्रधानांनाच पुढाकार घ्यावा लागेल. गुजरातमधील इशरत जहॉँ प्रकरणही बनावट
असून चौकशी झाल्यास नरेंद्र मोदी यांचे नाव पुढे येईल, असा दावाही
स्वामींनी केला.


आपत्ती मानवनिर्मितच
उत्तराखंडमधील आपत्ती मानवनिर्मित आहे. धार्मिक पर्यटनाच्या नावावर हिमालयातील ठिकाणांचे मोठ्या प्रमाणावर मार्केटिंग होत आहे. यातून निसर्ग उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न माफीया लोकांनी चालविले आहेत, त्याचा परिणाम म्हणून अशा घटना घडतात, असा आरोपही अग्निवेश यांनी केला.


अमरनाथ यात्रा अंधविश्वास
अमरनाथ येथील यात्रा अंधविश्वासाचे प्रतीक असल्याचा दावाही अग्निवेश यांनी केला. जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी बर्फामुळे शिवलिंगासारख्या प्रतिकृती तयार होत असतात. त्यामुळे प्रत्येक ठिकाणाला धार्मिकतेची जोड द्यायची काय? असा प्रश्न उपस्थित करतानाच परमेश्वर सर्वत्रच आहे, असेही त्यांनी नमूद केले.