आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांप्रमाणे अाता शिक्षकांचीही गुणवत्ता तपासणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पहिली ते आठव्या वर्गापर्यंत आता नैदानिक क्षमता चाचणी घेतली जाणार आहे. नैदानिक चाचणीच्या दृष्टिने माहिती देण्यासाठी शिक्षकांच्या प्रशिक्षणांचे नियोजन केले जात आहे. राज्यस्तर, विभाग, जिल्हा आणि तालुका स्तरावर प्रशिक्षण शिक्षकांना माहिती दिली जाणार आहे. नैदानिक चाचणी धोरणानुसार विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांचीदेखील गुणवत्ता तपासली जाणार आहे. केंद्र सरकारच्या मोफत व सक्तीचे शिक्षण हक्क कायद्यानुसार मागील पाच वर्षांपासून पहिली ते आठवीपर्यत विद्यार्थ्यांना थेट पुढच्या वर्गात प्रवेश दिला जात आहे.
विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जात असल्या तरी त्यांना नापास न करण्याच्या धोरणामुळे प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे राज्य शासनाने नैदानिक चाचणी घेण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. या निर्णयावर धोरणात्मक बदल करीत २०१५-१६ या शैक्षणिक सत्रापासून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची नैदानिक क्षमता चाचणी घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांवर येणा-या परीक्षांचा ताण हलका करण्यासाठी २०१० मध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाते; परंतु त्यांना अनुतीर्ण करायचे नाही, असा निर्णय आरटीई अंतर्गत घेण्यात आला होता. त्यामुळे गुणवत्तेचे नुकसान होत असल्याचे समोर आले होते.
शिवाय शिक्षण क्षेत्रात याविषयी नाराजीदेखील व्यक्त करण्यात आली होती. परीक्षा पुन्हा सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी ही जोर धरत होती. आगामी पाच वर्षांतील शैक्षणिक धोरण निश्चित करण्यासाठी मुंबई येथे बैठक झाली. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री विनोद तावडे, प्रधान सचिव नंदकुमार, शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, सर्व शिक्षण संचालक, सहसंचालक आणि उपसंचालक उपस्थित होते. याच बैठकीत आगामी शैक्षणिक सत्रापासून परीक्षा नव्हे तर क्षमता चाचणी घेण्यात यावी, असे निश्चित करण्यात आले. यास नैदानिक क्षमता चाचणी असे नाव देण्यात आले.
शिक्षकांचीही गुणवत्ता तपासली जाणार
पहिली ते आठवीपर्यंत अनुत्तीर्ण करायचे नाही; परंतु परीक्षा घ्यायची आहे. येणा-या शैक्षणिक सत्रापासून नैदानिक चाचणीतून विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी नवीन नियम लागू केले जाणार आहे. त्यासाठी ही चाचणी दोन सत्रांत असणार आहे. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांचीही गुणवत्ता तपासली जाणार आहे. मात्र, दोन वर्षांपर्यंत संबंधित शिक्षकांवर कारवाई होणार नाही.
दोन सत्रांत अशी असेल चाचणी
पहिली ते आठवीकरिता शाळा सुरू झाल्यानंतर आणि सहा महिन्यानंतर अशा दोन सत्रांत नैदानिक चाचणी परीक्षा घ्यायची आहे. या दोन परीक्षेत विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासून त्याचा अहवाल शिक्षण विभागास पाठवायचा आहे. पुन्हा दोन परीक्षा बाहेरील संस्थेमार्फत घेण्यात येईल.