आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिचारिकेने जपला मातृत्वाचा वसा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - इर्विन रुग्णालयात सात दिवसांपुर्वी आश्रमशाळेतील सतरा बालकं गोवरने त्रस्त असल्यामुळे उपचारासाठी दाखल झाले. यावेळी त्यांचे आई वडील त्यांच्याजवळ नव्हते मात्र इर्विनच्या परिचारिका अलका शिरसाठ यांनी त्या बालकांना अशी सेवा केली की, उपचारानंतर बालके घरी जाताना बालकांसोबत परिचारीकेचीही डोळे पाणावले.

जिल्ह्यातील एका आश्रमशाळेतील सतरा मुलांना गोवरची लागण झाली. १५ ऑगस्टला सतराही बालकांना तातडीने इर्विन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पाच ते नऊ वयोगटातील १७ पैकी १० बालकांवर सात दिवस उपचार करण्यात आले.

या बालकांसाठी स्वतंत्र वॉर्ड सुरू करण्यात आला. यात परिचारिका अलका शिरसाठ यांची नियुक्ती करण्यात अाली. गोवर असल्यामुळे त्या मुलांचे अंग तापाने फणफणत होते. अशावेळी प्रत्येक मुलाचे थंड पाण्याच्या कापडाने अंग पुसून देणे, त्यांना जेवण भरवून देणे, त्यांचे केस विंचरणे, त्यांना वेळेवर औषधी देणे, आदी पद्धतीने शिरसाठ यांनी या बालकांची सेवा केली. ही मुले आश्रमशाळेतील असल्याने त्यांच्या उपचारासाठी गरीब आई-वडीलांना शहरात येणेही अशक्य होते. शिरसाठ यांनी दिलेल्या सेवेमुळे गुरूवारी दहापैकी सात बालकांची प्रकृती सुधारल्याचे त्यांना घरी पाठवण्यात आले. शिरसाठ यांनी दिलेल्या सेवेचे इर्विनच्या मेट्रन मंदा गावंडे यांच्यासह अनेकांनी कौतुक केले.

साेपे जावे म्हणून शिकली ‘कोरकू’
उपचारासाठी दाखल झालेल्या बालकांना मराठी किंवा हिंदी भाषा कळत नाही. कारण ते आदिवासी भागातील आहे. त्यांची भाषा कोरकू आहे, अशावेळी बालकांना समजावे, त्यांची अडचण लक्षात यावी म्हणून अलका शिरसाठ या चक्क कोरकू भाषा शिकण्याचा प्रयत्न करत आहे. कोरकू भाषेतील महत्वाचे शब्द त्यांनी शिकल्यामुळे बालकांसोबत त्या कोरकू भाषेतूनच बहुतांश संवाद करत होत्या.