आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • One More Amravati Congress Leader Shifted In Shivsena Nwes In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विश्लेषण - लोकसभेत खोडकेंना गमावले; विधानसभेत गेल्या सुरेखाताई राकाँची घरघर थांबेना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - थेट गल्लीपासून दिल्लीपर्यंत धक्क्यामागून धक्के सहन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची घरघर थांबता थांबेना, अशी स्थिती निर्माण झाली आहे. माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष बबनराव पाचपुते... अशा अनेक नामावलीत बुधवारी (दि. २४) महिला आघाडीच्या माजी प्रदेशाध्यक्ष सुरेखा ठाकरे यांचेही नाव समाविष्ट झाले. त्यामुळे नेहमी बेरजेचे राजकारण करणाऱ्या शरद पवारांवर अलीकडे वजाबाकीचे राजकारण करण्याची वेळ का ओढवली, हा लाखमोलाचा प्रश्न विचारला जात आहे.
सुरेखा ठाकरे या जिल्ह्याच्या राजकारणातील एक दबंग नेतृत्व आहेत. केवळ सात सदस्यांच्या आधारे गेल्यावेळी त्यांनी राकाँला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळवून दिले होते. त्यामुळे एक प्रभावी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे. मात्र, ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पक्ष सोडल्यामुळे राष्ट्रवादीला पुन्हा एकदा घरघर लागली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी खोडके दाम्पत्याला राकाँतून बाहेर पडावे लागले, तर काल-परवापर्यंत जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष असलेल्या सुरेखा ठाकरे यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राकाँला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. या दोन्ही धक्क्यांतून राकाँ कशी सावरते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
वीज तोडो ते स्वयंसिद्धा
एक झुंझार महिला कार्यकर्ती म्हणून कोठेही कमी पडणाऱ्या सुरेखा ठाकरे शेतकरी संघटनेच्या तालमीत तयार झाल्या होत्या. शेतकरी संघटनेच्या तत्कालीन ‘वीज तोडो’आंदोलनात कोकिळा काळमेघ यांच्यासमवेत त्या पहिल्यांदा झळकल्या. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य आणि नंतरच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेत थेट सुप्रिया सुळे यांच्या स्वयंसिद्धा अभियानापर्यंत त्यांनी मजल मारली होती.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी पूर्णत: पक्षनिष्ठा राखत सुरेखाताईंनी राकाँचा प्रचार केला होता. प्रसंगी खासदार आनंदराव अडसूळ यांचा उपमर्द करायलाही त्यांनी मागेपुढे पाहिले नव्हते. मात्र, तेच अडसूळ आज त्यांच्या सेना प्रवेशाला कारणीभूत ठरले आहेत. सुरेखा ठाकरेंचे जिल्हा परिषद अध्यक्षपद शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे होते. त्यामुळे सुरेखाताई आमच्या विरोधात कसे बोलणार, असे शिवसेनेतर्फे वारंवार म्हटले जायचे. यावर सुरेखाताई ठाकरे यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सोडण्याची घोषणाही केली होती.
सुरेखाताईंच्या धनुष्यामुळे दुसरा हादरा
सुरेखा ठाकरे यांनी शिवसेनेचे धनुष्य उचलल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला दुसरा हादरा बसला आहे. आमदार रवि राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांना लोकसभेचे तिकीट दिल्यामुळे प्रदेश महासचिव संजय खोडके नाराज होते. आता सुरेखा ठाकरे यांनीही पक्ष सोडल्यामुळे राकाँ अगदी नवख्यांच्या हाती, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
हा सत्तालोभ नव्हे तर काय ?
दरम्यान,त्यांच्या पक्ष सोडून जाण्याला काहींनी सत्तेचा लोभ म्हटले असून, काहींनी हे तर स्वाभाविकच होते, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जिल्हा परिषदेची सत्ता उपभोगण्यासाठी त्यांनी शेतकरी संघटना सोडून राकाँची घड्याळ बांधली होती, तर आता विधानसभेत जाणारा मार्ग निवडण्यासाठी त्यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण उचलले, असेही काहींचे म्हणणे आहे.