आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांच्या शहरात सुरक्षा यंत्रणेचेे धिंडवडे, अाणखी एक कैदी पळाला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- उपराजधानीच्या मध्यवर्ती कारागृहातून पाच कुख्यात कैदी पळून गेल्याचे प्रकरणा ताजे असतानाच साेमवारी दुपारी बाराच्या सुमारास जन्मठेपेची शिक्षा झालेला अाणखी एक कैदी नागपुरातील खुल्या कारागृहातून पळून गेला. या घटनेमुळे मुख्यमंत्र्यांच्या शहरातील सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले अाहे.

पुरुषोत्तम रामाजी भोयर (रा. बोदली, गडचिरोली) असे फरार कैद्याचे नाव अाहे. गडचिरोली सत्र न्यायालयाने खुनाच्या प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. पुरुषोत्तम हा शिक्षेच्या अंतिम टप्प्यात असून त्याच्या चांगल्या वर्तणुकीमुळे त्याला खुल्या कारागृहात हलविण्यात आले होते. साेमवारी सकाळी नऊ वाजता सात कैद्यांना तुरुंग पोलिस उपमहानिरीक्षकांच्या बंगल्याभोवती साफसफाई करण्यासाठी कारागृहाबाहेर काढण्यात आले होते. या कैद्यांवर एक सुरक्षा रक्षक पाळत ठेऊन होता. दुपारी १२ वाजताच्या सुमारास सुरक्षा रक्षकाने कैदी मोजले असता एक कैदी कमी दिसला. प्रशासनाच्या ध्यानात येईपर्यंत कैदी सुरक्षारक्षकाच्या हातावर तुरी देऊन पसार झाला होता. धंतोली पोलिस ठाण्यात गुन्हा नाेंदवला आहे.
ढिसाळ प्रशासन
गेल्या ३१ मार्च रोजी मोक्काचे पाच कुख्यात कैदी नागपूर मध्यवर्ती कारागृहाची सुरक्षा भेदून पळून गेले. या प्रकरणात तुरुंग अधीक्षकासह ११ जण निलंबित झाले. तर एक शिपाई बडतर्फ झाला. या घटनेतून धडा न घेता नागपूर मध्यवर्ती कारागृह प्रशासनाचे ढिसाळ प्रदर्शन सुरूच आहे.

यापूर्वीही पळाला होता
मार्च महिन्यात पॅरोलवर तुरुंगाबाहेर आल्यानंतर पुरुषोत्तम भोयर हा यापूर्वीही बेपत्ता झाला होता. पॅरोलची मुदत संपल्यानंतर तुरुंग प्रशासनाची धावाधाव सुरू झाली. त्यानंतर जवळपास एक महिन्याने ९ मे २०१५ रोजी गडचिरोली पोलिसांनी पुरुषोत्तम अटक केली होती. पॅरोलवरुन पळाल्यानंतर खुल्या कारागृहात कायम कसा? असा सवालही विचारण्यात येत आहे.