नागपूर - ‘मला साहित्य, खेळ, वाचनाची प्रचंड आवड आहे. खासदार असताना खूप वाचत होतो. पण मुख्यमंत्री झाल्यानंतर मात्र गेल्या साडेचार वर्षांत सरकारी फाइल्स आणि आमदारांच्या पत्रांशिवाय काहीही वाचले नाही. अगदी वर्तमानपत्रेही वाचत नव्हतो. क्वचित वेळ मिळालाच तर वरवर फक्त चाळत होतो...’ अशी प्रांजळ कबुली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
यांनी शुक्रवारी प्रकट मुलाखतीत दिली. आधारतर्फे आयोजित ‘साक्षात एक मनमोकळा संवाद’ या कार्यक्रमात ते बोलत होते. 'एबीपी माझा'चे संपादक राजीव खांडेकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. चव्हाण यांनी मांडलेली मते त्यांच्याच शब्दांत...
मराठी सक्तीची खंत
दिवंगत मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी एका चांगल्या हेतूने शालेय शिक्षण मातृभाषेतून देण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी आठवीपासून इंग्रजी शिकवण्यात येत असे. मात्र या निर्णयाचे दूरगामी परिणाम महाराष्ट्रावर झाले. स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्र मागे पडला, त्याची खंत आजही आहे. आमच्या दोन पिढ्यांचे नुकसान यामुळे झाले. सैन्यात तसेच प्रशासनातील
उच्च पदांवर त्यामुळे मराठी मुले आजही फारशी दिसत नाही. आम्ही आता पहिलीपासून इंग्रजी पुन्हा सुरू केले. पण त्याचे परिणाम यायला वेळ लागेल.
गेल्या साडेचार वर्षांत वाचण्यासाठी वेळच मिळाला नाही. मात्र, आता परत वाचायला सुरुवात करणार आहे. राजकारणात मी स्वत:साठी लक्ष्मणरेषा आखून घेतली होती. माझ्यावर झालेले संस्कार आणि घरातील वातावरणामुळे कदाचित हे शक्य झाले असेल. प्रत्येक वेळी मनासारखे निर्णय नाही घेता आले. काही वेळा तडजोडी कराव्या लागल्या. मी लक्ष्मणरेषा कितपत पाळली वा ओलांडली हे जनतेनेच ठरवायचे आहे. पण एक मात्र सांगू शकतो, ठरवले तर प्रत्येकाला
लक्ष्मणरेषा आखता येणे शक्य आहे.
नागपूरकर शिक्षिकेची मदत
कऱ्हाडहून दिल्लीला शिकायला गेलो त्या वेळी तिथे एकाही शाळेने प्रवेश दिला नाही. शेवटी परतीची तिकिटेही काढली. त्या वेळी कोणीतरी नूतन मराठी विद्यालयात जाऊन पाहण्यास सांगितले. तिथे गेलो तर मुख्याध्यापिका व-हाडपांडे यांनी प्रवेश दिला. त्या नागपूरच्या होत्या. तो प्रवेश टर्निंग पॉइंट ठरला.