आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दत्तक घेणार्‍या जोडप्यांच्या संख्येत वाढ, जन्मदात्या आईला नऊ मुली-चार मुले परत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - पहिली बेटी तुपरोटी, असे म्हणण्याचे दिवस आता परत आले आहे. आतापर्यंत नकोशी असलेली ती आता एकदम हवीहवीशी झाली असून, घरांमध्ये आता मुलांइतकेच मुलीच्या जन्माचेही स्वागत होत आहे. मुलींकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला असून, आता मुलींना दत्तक घेणार्‍यांची संख्या वाढली असल्याची माहिती वरदान, इंडियन असोसिएशन फॉर प्रमोशन ऑफ अँडॉप्शन अँड चाईल्ड वेलफेअरच्या विदर्भ चॅप्टरच्या उपसंचालक, दत्तक सेवा पल्लवी पडोळे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

पूर्वी दत्तक घेणे हा सर्वात शेवटचा पर्याय राहत असे. आता हे चित्र पूर्णपणे बदलले असून, स्वत:चे मूल असतानाही लोक दत्तक घेत आहे. यात तरुण जोडप्यांची संख्या मोठी असून, कुटुंबाचाही पाठिंबा वाढल्याचे पडोळे यांनी सांगितले. पूर्वी मुलांसाठी वेटिंग लिस्ट राहायची, आता मुलींसाठी वेटिंग लिस्ट आहे. ज्यांना मूल होऊ शकत नाही असे दाम्पत्य, अविवाहित प्रौढ स्त्री वा पुरुष वा ज्यांना स्वत:चे मूल आहे असे दाम्पत्यही इच्छा असल्यास दत्तक घेऊ शकते. एक वा दोन मुली असतानाही पुन्हा मुलगी दत्तक घेणार्‍यांची संख्या मोठी आहे, परंतु अलीकडे आम्ही शक्यतो ज्यांना मूल होऊ शकत नाही असे दाम्पत्य, अविवाहित प्रौढ स्त्री वा पुरुष

यांनाच दत्तक देतो, असे पडोळे यांनी स्पष्ट केले. सेंट्रल अँडॉप्शन रिसोर्स अँथॉरिटी,कारा, दिल्लीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार दत्तक प्रक्रियेचे काटेकोर पालन केले जाते.

2012-13 या वर्षात वरदानमध्ये 13 मुले आली. पाच मुले व आठ मुली होत्या. त्यापैकी 10 मुलं दत्तक गेली. त्यात सहा मुली व चार मुले होती. 2011-12 मध्ये संस्थेत नऊ मुलं आली. त्यात चार मुले व पाच मुली होत्या. त्यापैकी तीन मुले व नऊ मुली दत्तक गेल्या. यात आकडेवारीत तुम्हाला तफावत दिसेल, पण अनेकदा त्या वर्षी संस्थेत आलेली सर्वच मुलं दत्तक जात नाही. प्रकृती वा अन्य कारणांमुळे ही मुलं संस्थेतच राहतात. ती पुढील वर्षी दत्तक दिली जातात असे पडोळे यांनी स्पष्ट केले.

1994 ते 2013 या कालावधीत संस्थेत 434 मुलं आली. त्यात 193 मुले आणि 251 मुली होत्या. त्यापैकी 385 मुलं दत्तक गेली. त्यामध्ये 162 मुले आणि 223 मुलींचा समावेश होता.

जन्मदात्या आईला नऊ मुली, चार मुले केली परत

संस्थेत जास्तीत जास्त कुमारी मातांची मुले येतात. कुमारी माता संस्थेत मूल सोडून गेल्यावर तिला दोन महिन्यांचा पुनर्विचार कालावधी असतो. या दोन महिन्यांत नैसर्गिक पालकांना बाळ परत नेण्याची पूर्ण मूभा असते. मात्र दोन महिन्यांनंतर बाळ कायदेशीररित्या दत्तकसाठी मुक्त केले जाते. 1994 ते 2013 या कालावधीत 13 कुमारी मातांनी पुनर्विचार कालावधीत परत येऊन आपले बाळ परत नेले. त्यात नऊ मुली व चार मुलांचा समावेश असल्याचे पडोळे यांनी स्पष्ट केले. याशिवाय मूक बधीर, हृदय, किडनी, त्वचारोग असलेली मुलंही दत्तक घेणारे पालक आहेत. आतापर्यंत दहा मुलं दत्तक देण्यात आली.