आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Outsourcing Support Take For The Hospital, Dr.Vijaykumar Gawit Confessed

रुग्णालयांत आउटसोर्सिंगचा आधार घ्‍यावा लागतो, डॉ. विजयकुमार गावित यांची ग्वाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयांमध्ये मनुष्यबळाची कमतरता चिंतेचा विषय आहे. स्वत:च्या जबाबदारीचे भान या यंत्रणेतील कर्मचा-यांना उरले नसल्याने सरकारला आउटसोर्सिंगचा आधार घ्यावा लागत आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभाग (डीएमईआर) यावर लवकरच हा निर्णय मार्गी लागेल, अशी ग्वाही राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
गुरुवारी हिवाळी अधिवेशनानिमित्त त्यांनी निवडक पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. गावित म्हणाले की, वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयांतील अनेक दुखण्यांवर रामबाण औषध उपलब्ध करून दिले जाईल. एमसीआयच्या नियमानुसार राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदभरती केली जात आहे. तृतीय व चतुर्थ श्रेणीतील बहुतांश कर्मचारी आरोग्याला अत्यावश्यक सेवा मानायलाच तयार नसल्याने सरकारला नाइलाजास्तव आउटसोर्सचा निर्णय घ्यावा लागत आहे. कॅबिनेटचा निर्णय झाल्यानंतर मुख्य सचिव आणि अर्थ सचिवांच्या मंजुरीनंतर लवकरच हा निर्णय घेतला जाईल. नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या मेयो विस्तारीकरणासंदर्भात ते म्हणाले की, मुलांचे वसतिगृह, ओपीडी, अपघात विभागाच्या कामांसाठी 78 कोटी प्रस्तावित आहेत. येत्या आठ दिवसांत हे काम सुरू होणार आहे. 250 खाटांच्या रुग्णालयासंबंधी बृहत आराखड्यात काही फेरबदल आवश्यक असून, महिनाभरात हेही काम सुरू होईल, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.
बीपीएलसाठी एमआरआय मोफत
दारिद्र्यरेषेखालील रुग्णांना रोगनिदान सेवा मिळावी, यासाठी सिटीस्कॅन व एमआरआय मोफत करण्याचा प्रस्ताव होता. त्यासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. सल्लागार नेमून लवकरच हा प्रश्नही मार्गी लागेल.
कॅन्सर प्रस्ताव केंद्राकडे : नागपुरातील जीएमसी येथे कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या स्थापनेचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवणार आहे. 120 कोटींच्या या प्रस्तावात 75 टक्के वाटा केंद्राचा, तर राज्य सरकार 25 टक्के खर्च पेलणार आहे. अधिवेशन आटोपताच हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे.
अकोल्यात कॅन्सर रुग्णालय ? मुंबई आणि नागपुरातील शासकीय कॅन्सर रुग्णालयावरील भार कमी करण्यासाठी पुणे आणि अकोला येथील शासकीय महाविद्यालयांमध्ये कॅन्सर रुग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. वित्त विभागाच्या मंजुरीनंतर या रुग्णालयांच्या कामांना गती येणार असल्याचेही डॉ. गावित यांनी या वेळी सांगितले.
अतिवृष्टीवरील चर्चेत मंत्र्यांचाच दुष्काळ
अतिवृष्टीवरील चर्चेच्या वेळी विधानसभेत मंत्र्यांचीच गैरहजेरी होती. या मुद्द्यावर विरोधकांनी दोनदा सरकारला धारेवर धरले. एकदा कामकाजही तहकूब करावे लागले.
अतिवृष्टीवरील चर्चा सुरू झाली तेव्हा सभागृहात दोन मंत्री होते. चर्चा सुरू करणारे भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवर यांनी पीठासीन अधिका-यांचे याकडे लक्ष वेधले. मुनगंटीवर म्हणाले सभागृहात एक क्रीडामंत्री आणि दुसरे प्रदूषण नियंत्रण मंत्री आहेत. त्यामुळे चर्चा कशी होणार. हा प्रकार लक्षात आल्यावर गोंधळ होऊन सभागृहाचे कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब झाले. बच्चू कडू चर्चेला सुरुवात करत असताना पुन्हा सभागृहात मंत्र्यांच्या अनुपस्थितीचा विषय उपस्थित झाला. संतप्त सदस्यांनी उपाध्यक्ष वसंत पुरके यांच्या आसनाजवळ येऊन गोंधळ घालायला सुरुवात केली. पुरके यांनी चार मंत्री हजर असल्याचे सांगत समाधान करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर काही मंत्री सभागृहात दाखल होताच सदस्यांचे समाधान होऊन चर्चेला सुरुवात झाली.