आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपजीविकेसाठी केवळ संगीतावरच अवलंबून राहू नका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - संगीत कलेला उपजीविकेचे साधन करू नका. त्याकडे केवळ छंद म्हणून पाहा. उपजीविकेसाठी केवळ संगीतावरच अवलंबून राहाल तर जीवन जगणे अवघड होईल, असा संदेश ख्यातकीर्त मोहनवीणावादक पं. विश्वमोहन भट्ट यांनी येथे दिला. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे आयोजित नादब्रह्म उपक्रमात वीणावादन करण्यासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.

केवळ संगीत हे उपजीविकेचे साधन होऊ शकत नाही. कारण पुरेसा पैसा नाही. आपापला व्यवसाय वा नोकरी सांभाळून संगीताची उपासना करायला हरकत नाही. माझ्याबद्दल बोलायचे तर माझे निभून गेले म्हणा. पण प्रत्येकाच्या बाबतीत हे शक्य होत नाही याकडे भट्ट यांनी लक्ष वेधले. संगीत म्हटले की तासन्तास चालणारा रियाज आलाच. पण रियाजाचे टेंशन घेण्याचे कारण नाही. चोवीस तासांतून किमान एक तास रियाज केला तरी पुरेसा आहे. माझ्या कारकीर्दीत मी कधीही दोन तासांपेक्षा जास्त वेळ रियाज नाही केला, असे भट्ट यांनी स्पष्ट केले. जीवनाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन सकारात्मक आहे. कुठल्याही गोष्टीत वा कोणामध्ये चुका काढणे खूप सोपे आहे. कारण चुका सहज काढता येतात. पण प्रत्येकामध्ये काही सकारात्मक शोधणे तेवढेच कठीण आहे याकडे भट्ट यांनी लक्ष वेधले.

चुका काढणारे उद्या देवामध्येही चुका काढतील. पण नकारात्मक विचार माझ्या मनात येतच नाही. माझी विचारशैलीही सकारात्मक आहे. अनेकांना बॉलीवूडमधील नवे गायक, नवी गाणी व संगीताबद्दल तक्रारी असतात. पण माझ्या मते सध्या बॉलीवूडमध्ये सुवर्णयुग आहे. अमेरिकेवरही मात करतील इतके सुसज्ज आणि अत्याधुनिक स्टुडिओ इथे आहेत. तांत्रिक सफाई, ध्वनिमुद्रण, गीतलेखन सर्वच बाबतीत बॉलीवूड सरस आहे. नव्या दमाचे गायक चांगले गात आहेत, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
मोठा मुलगा वारसदार
माझा मोठा मुलगा सलील भट्ट हा माझी परंपरा सर्मथपणे पुढे चालवत आहे, तर लहान मुलगा सात्त्विक हा संगीतकार आहे, असे भट्ट यांनी सांगितले. नव्या पिढीत बनारसची कविता दास ही गुणी आणि प्रतिभावान मोहनवीणावादक आहे. गायकांमध्ये र्शेया घोषाल अप्रतिम गाते. तिला सरस्वतीचा वरदहस्त आहे, अशा शब्दांत र्शेयाचे कौतुक केले.

गागाभट्टांचे वंशज
महाराष्ट्र राज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक करण्यासाठी काशीहून पंडित गागाभट्टांना आणण्यात आले होते. मोहनवीणावादक पं. विश्वमोहन भट्ट हे त्या गागाभट्टांचे वंशज आहेत. आपण गागाभट्टांचे वंशज असल्याचा आपल्याला अभिमान असल्याचे भट्ट यांनी सांगितले.

सोशल मीडिया उत्तम
आमच्या वेळेस आम्हाला केवळ आकाशवाणीवर अवलंबून राहावे लागायचे. आता जग खूप पुढे गेले आहे. सोशल मीडियामुळे क्षणात जगभर पोहोचता येते. ‘हाऊ टू प्ले मोहनवीणा’ हा माझा शैक्षणिक व्हिडिओ यू-ट्यूबवर पाहून अनेक जण मोहनवीणावादन शिकले. अनेकदा माझा कार्यक्रम संपवून मी हॉटेलवर परतत नाही तोच त्याचा व्हिडिओ यू-ट्यूबवर डाऊनलोड झालेला असतो. ही नव्या युगाची देणगी आहे. बांगलादेशात एका चाहत्याने मोहनवीणावादन प्रशिक्षण संस्था सुरू केली. तेथे शंभर विद्यार्थी शिकत होते. माझा व्हिडिओ आणि कार्यक्रम पाहून मुले निष्णात झाली, असे भट्ट यांनी सांगितले.