आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉम्प्लेक्स, थिएटरमध्ये ‘वाहनतळा’साठी वसुली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - व्यावसायिक संकुलांत, मल्टिप्लेक्स अथवा चित्रपटगृहांत येणार्‍या ग्राहकांना वाहन पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी खासगी पे अँड पार्कची अजब प्रथा अमरावतीत रूढ झाली आहे. प्रशासकीय दुर्लक्षामुळे मागील अनेक वर्षांपासून अमरावतीत हा गोरखधंदा सुरू असून, त्यातून अमरावतीकरांच्या खिशातून आतापर्यंत लाखो रुपये उकळण्यात आले आहेत. ठरावीक अधिकार्‍यांना हाताशी धरून काहींनी पे अँड पार्कची परवानगी असल्याची कागदपत्रेही महापालिकेकडून मिळवून घेतल्याचा दावा केला आहे.
नगररचना विभागाच्या नियमांनुसार घर अथवा व्यावसायिक वापरासाठी कोणतेही बांधकाम करताना पार्किंगसाठी जागा सोडणे आवश्यक आहे. व्यावसायिक संकुलं, सिनेमाघर, मॉल्स, व्यावसायिक इमारतींच्या ठिकाणी पार्किंगसाठी सोडलेली जागा संबंधिताने तेथे येणार्‍या ग्राहकांना वाहने उभी करण्यासाठी उपलब्ध करून देणे अभिप्रेत आहे. मात्र, स्थानिक अधिकार्‍यांना हाताशी धरून अनेक ठिकाणी स्वयंघोषितपणे पे अँड पार्क पद्धत रबवून ग्राहकांना लुबाडण्याचे सत्र सुरू आहे.
वाहतुकीला अडथळा : पार्किंगसाठी दहा रुपये द्यावे लागतील म्हणून अशा ठिकाणी येणारे ग्राहक आपले वाहन पार्किंगच्या ठिकाणी उभे न करता, रस्त्यावर उभी करतात. त्यामुळे पार्किंगमुळे रस्ता व्यापला जातो. परिणामी, वाहतूक पोलिसांनी डोकेदुखी वाढते व वाहतूक व्यवस्थेची ऐशीतैशी होते. मात्र, या प्रकाराकडे संबंधित यंत्रणांचेही दुर्लक्षच आहे.

कोट्यवधीची कमाई
पे अँड पार्क असलेल्या खासगी व्यावसायिक संकुलं, सिनेमाघरांमध्ये दररोज किमान शंभर दुचाकी पार्क झाल्यास मॉल मालकाला, सुपर मार्केटवाल्यांना काही न करता एक हजार रुपयांची कमाई मिळते. किमान 20 कार अथवा तीनचाकी जरी पार्क झाल्या, तरी 600 रुपये रोजची कमाई होत असल्याचे चित्र आहे. ही वसुली कुणाच्या कायदेशीर परवानगीने केली जाते, याचे उत्तर द्यायला कुणीही तयार नाही.

पार्किंगसाठी वसुली चुकीची
बांधकाम करताना पार्किंगसाठी जागा सोडणे बंधनकारक आहे. ज्या ठिकाणी व्यावसायिक कारणासाठी जागेचा वापर होतो, त्या ठिकाणी येणार्‍या ग्राहकांकडून पार्किंगसाठी स्वतंत्रपणे पैसे वसूल करणे पूणर्त: अयोग्य आहे. याबाबत आम्हाला डी-मार्टबाबतची तक्रार आली आहे. त्याची चौकशी करण्यात येईल.
सु. पुं. कांबळे, सहायक संचालक, नगर रचना (मनपा)