छायाचित्र: अरुण गवळी याची मंगळवारी पंधरा दिवसांच्या पॅरोलवर तुरुंगातून सुटका करण्यात आली. या वेळी त्याच्या स्वागतासाठी नातेवाईक व समर्थकांनी गर्दी केली होती.
नागपूर - शिवसेना नगरसेवकाच्या खुनात नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याचा थाट एका कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्याला लाजवेल असा आहे. मुलाच्या लग्नासाठी पंधरा दिवसांच्या पॅरोलवर कारागृहाबाहेर पडताच अरुण गवळीच्या स्वागतासाठी तीनशेवर कार्यकर्ते हजर होते, तर सात लक्झरी वाहनांसह मागे-पुढे पन्नासवर दुचकीस्वार असा ताफा होता.
अरुण गवळीचा मुलगा महेश याचा ९ मे रोजी मुंबईत विवाह आहे. महेशची सासुरवाडीही नागपुरातील आहे. मुलाच्या लग्नासाठी हजर राहता यावे म्हणून गवळीने याने पॅरोलसाठी अर्ज केला होता. उच्च न्यायालयाने ३० एप्रिल रोजी अरुण गवळीला पंधरा दिवसांचा पॅरोल मंजूर केला. त्यानंतर सरकारी सुट्यांमुळे गवळीला कारागृहाबाहेर निघण्यासाठी आज मंगळवार उजाडला. मंगळवारी सकाळी ११ वाजेपासून त्याचे वकील कारागृहातील कार्यवाही पूर्ण करत होते. अखेर दुपारी १.३० च्या सुमारास अरुण गवळी कारागृहाबाहेर आला. अरुण गवळीला घेण्यासाठी त्याचा मुलगा महेश हा दोन दिवसांपासून
आपल्या ७८ साथीदारांसह तुली इम्पेरियल या हॉटेलमध्ये तळ ठोकून होता.
अरुण गवळीच्या स्वागतासाठी कारागृहासमोर तीनशेवर लोकांनी गर्दी केली होती. कारागृहाबाहेर जमलेल्या लोकांनी टाळ्या वाजवून अरुण गवळीचे स्वागत केले. लोकांच्या हातून पुष्पगुच्छ, हार स्वीकारून गवळी हा कारागृहाबाहेर पडताच पांढ-या रंगाच्या स्कोडा गाडीत बसला आणि सर्व ताफा थेट समाजबांधव हरीश हिरणवर यांच्या रामनगर येथील घरी पोहोचला.
वाचा, सीएम नव्हे, डॉन