आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • People Come Together For The Separate Vidarbh State

वेगळ्या राज्याच्या मागणीसाठी विदर्भवादी सरसावले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - तेलंगणा राज्याच्या निर्मितीची घोषणा कुठल्याही क्षणी होण्याची शक्यता असताना विदर्भवादीही वेगळ्या राज्याच्या मागणीसाठी सरसावले आहेत. कॉँग्रेसचे खासदार विलास मुत्तेमवार यांनी ‘यूपीए’च्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून विदर्भ राज्याची मागणी पूर्ण करण्याची मागणी केली आहे.


ही मागणी पूर्ण न झाल्यास वैदर्भीयांच्या मनात दुर्लक्षित झाल्याच्या भावना निर्माण होऊन हिंसक आंदोलन सुरु होऊ शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे विदर्भ संयुक्त कृती समितीच्या नेत्यांनी ‘चलो दिल्ली’चा नारा देत स्वतंत्र राज्याची मागणी दिल्लीत जाऊन रेटण्याचा कार्यक्रम आखला आहे.


आंध्रप्रदेशातील तेलंगणा राज्याच्या निर्मितीची घोषणा जसजशी जवळ येत आहे, तशी विदर्भवाद्यांमधील अस्वस्थता वाढत आहे. त्याचाच परिणाम म्हणून खासदार विलास मुत्तेमवार यांनी सोनिया गांधी यांना विदर्भ राज्याची मागणी करणारे पत्र लिहिले आहे. ‘ऐतिहासिकदृष्ट्या विदर्भ नेहमीच काँग्रेस नेतृत्वाच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे. नेहरू आणि गांधी परिवाराशी विदर्भाचे भावनात्मक नाते आहे’, असे भावनिक आवाहन करताना मुत्तेमवार यांनी वैदर्भीयांची वेगळ्या राज्याची मागणी प्रामाणिक व तथ्यावर आधारित असल्याचे म्हटले आहे. आता तेलंगणा राज्याची निर्मिती होत असताना विदर्भाच्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास असंतोषाची स्वाभाविक प्रतिक्रिया उमटू शकते. विदर्भाची मागणी पूर्ण न झाल्यास दुर्लक्षितपणाची भावना निर्माण होऊन विदर्भात हिंसक आंदोलनांना सुरुवात होऊ शकते, अशी भीतीही खासदार मुत्तेमवार यांनी व्यक्त केली आहे.


5 ऑगस्ट रोजी आठवलेंचा नागपुरात मोर्चा
रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही स्वतंत्र विदर्भास पाठिंबा दिला आहे. ‘विदर्भावर सरकारने नेहमीच अन्याय केलेला आहे.छोट्या-छोट्या राज्याची निर्मिती केल्याने विकासाला गती मिळते. त्यामुळेच वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी 5 ऑगस्ट रोजी नागपुरात भव्य मोर्चा काढण्यात येईल,’ अशी घोषणाही आठवले यांनी केली.


कृती समितीला ‘आम आदमी’ पक्षाचाही पाठिंबा
राजकीय नेत्यांनी पडद्याआड राहून स्वतंत्र विदर्भाची मागणी रेटण्याचे प्रयत्न चालविले असतानाच विदर्भाच्या मागणीसाठी सातत्याने आंदोलन करणा-या विदर्भ संयुक्त कृती समितीने आक्रमक होत थेट ‘चलो दिल्ली’चा नारा दिला आहे.
समितीचे नेते व निवडक कार्यकर्ते 2 जुलै रोजी दिल्लीकडे प्रयाण करणार आहेत. 5 जुलै रोजी जंतरमंतर येथे धरणे दिले जाणार असून अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने पाठिंबा दिला असल्याची माहिती समितीच्या नेत्यांनी दिली.
दिल्लीतील मुक्कामात सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना भेटून विदर्भाची मागणी रेटली जाणार आहे. दिल्लीला जाणा-या प्रमुख नेत्यांमध्ये माजी आमदार वामनराव चटप, आशीष रणजित देशमुख, अहमद कादर तसेच विदर्भाच्या आंदोलनात मागील काही वर्षांपासून सक्रीय असलेले माजी पोलिस महासंचालक प्रबीरकुमार चक्रवर्ती यांचा समावेश आहे.