अमरावती - इंडियन नॅशनल आर्मी (आयएनए) नावाने ओळखल्या जाणार्या तत्कालीन आझाद हिंद सेनेचा जपानमध्ये बंदिस्त कोट्यवधी रुपयांचा मौल्यवान खजिना भारत केव्हा परत आणणार? त्यांच्या मृत्यूचे गूढ केव्हा उकलणार? मृत्यूची नेमकी तारीख ठरवणार की नाही? आदी प्रश्न सध्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर उभे ठाकले आहेत.
नेताजींचे सहकारी तथा अमरावतीच्या विदर्भ शासकीय ज्ञान-विज्ञान संस्थेचे माजी प्राचार्य सुरेशचंद्र पाध्ये यांनी एक याचिका दाखल केली आहे. त्यावर महिनाभरात केंद्र शासनाने आपली बाजू मांडावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
आझाद हिंद सेनेने दुसर्या महायुद्धाच्या वेळी जपानच्या बाजूने ब्रिटिशांशी निकराची झुंज दिली होती. त्याचा सूड घेण्यासाठी ब्रिटीश सरकार नेताजींचा पिच्छा पुरवत होते; परंतु जपानचे तत्कालीन सैन्यप्रमुख फिल्ड मार्शल टेराऊची यांनी नेताजींना ‘कव्हर’ केले.
मी असेपर्यंत तुम्हाला कुणी हातही लावू शकणार नाही, असे त्या अधिकार्याचे म्हणणे होते. त्यामुळे भूमिगत होण्यापूर्वी भारतीय लोकांनी दिलेले दाग-दागिने व इतर मौल्यवान वस्तूंचा ठेवा नेताजींनी जापान सरकारकडे सोपवला होता. त्याची आजची किंमत कमीत कमी आठ हजार कोटी रुपये इतकी आहे. भारत सरकारने प्रयत्न केल्यास तो ठेवा आजही आपल्या देशाला परत मिळू शकतो. मात्र मी हे का करू, शासनाने पत्रव्यवहार करून हे केले पाहिजे, असे याचिकाकर्ते पाध्ये यांचे म्हणणे आहे.
मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी कमिशन आणा
नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झाल्याचे सांगितले जाते; परंतु तो अपघातच झाला नाही, असे न्या. मुखर्जी आयोगाचे म्हणणे आहे. त्यापूर्वीच्या चौकशी यंत्रणा म्हणजे शहानवाज समिती व न्या. खोसला कमिशनने मात्र अपघाताचीच री ओढली होती; परंतु या दोन्ही यंत्रणांनी तैवानच्या कथित अपघातस्थळास भेट दिली नव्हती. न्या. मुखर्जी आयोगाने पहिल्यांदा हे केले. मात्र, त्यांनी सादर केलेला वस्तुनिष्ठ अहवाल संसदेने स्वीकारला नाही. त्यामुळे आता नवे कमिशन नेमून नेताजींच्या मृत्यूची नेमकी तारीख सांगा, असे संबंधित याचिकेचे म्हणणे आहे.
रेणकोजी मंदिर ते हव्याप्र. मंडळ ‘कनेक्शन’
विमान अपघातात मृत्यू (18 ऑगस्ट) दाखवून जपानच्या रेणकोजी मंदिरात ठेवण्यात आलेल्या अस्थी नेताजींच्या नाहीतच. अमरावतीच्या हव्याप्र. मंडळाचे तत्कालीन ज्येष्ठ पदाधिकारी हरिहरराव देशपांडे यांचे सुपुत्र (ज्ञानेश्वर) मार्शल आर्टचे धडे घ्यायला त्या काळी जपानला गेले होते. तेथेच एका महिलेशी त्यांचा विवाह झाला, त्यामुळे ते तेथेच स्थायिक झाले. त्या महिलेचे वडील हे रेणकोजी मंदिराचे मुख्य पुजारी होते. पुजार्यांचे जावई आणि मूळ भारतीय असलेल्या ज्ञानेश्वर यांचा आधार घेत बनावट अस्थींना नेताजींच्या अस्थी दाखवण्यात तत्कालीन सरकार यशस्वी झाले.
अपघात न झाल्याचा हा घ्या पुरावा
ज्या अपघातात नेताजींचेच प्राणोत्क्रमण झाले, त्या वेळी त्यांच्यासोबत भारतीय सहकारी हबी ऊर रहेमानही होते. विमान जमिनीपासून 400 ते 5,000 फूट उंचीवरून उडते. ते जेव्हा कोसळले असेल, तेव्हा नेताजी देह ठेवतील आणि हबी ऊर रहेमान यांचे केवळ हात भाजतील, असे कसे होईल? त्यामुळे अपघात हा केवळ बनाव आहे. शिवाय न्या. मुखर्जी कमिशनने तो उघडही केला आहे. त्यामुळे नेताजींच्या मृत्यूबद्दलच्या भूलथापा थांबवाव्यात. - प्राचार्य सुरेशचंद्र पाध्ये, याचिकाकर्ते
(फोटो - संग्रहित छायाचित्र)