आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Phones, Batteries Seized From Inmates In Nagpur Jail

कैद्यांना पळून जाण्यासाठी मदत करणारे आणखी दोन जण जेरबंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - मध्यवर्ती कारागृहातून पळून जाण्यासाठी पाच कुख्यात कैद्यांना मदत करणार्‍या अधिक दोघांना नागपूर पोलिसांनी बुधवारी अटक केली. या आरोपींकडून पाच रिव्हॉल्व्हर आणि ३७ काडतुसे जप्त करण्यात आल्या आहेत. यापूर्वीही दोन आरोपींना अटक करण्यात आली होती, सध्या ते पोलिस कोठडीत आहेत.

३१ मार्चच्या मध्यरात्री पाच कैदी नागपूर कारागृहातून पळून गेले. त्यांच्या मागावर नागपूर पोलिसांनी पाच पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केली आहेत. या कैद्यांकडे कारागृहात असताना मोबाइल होते. या मोबाइलवरून ते कारागृहाबाहेरील साथीदारांशी संपर्कात होते. मोबाइल टॉवर लोकेशन आणि सीडीआर रिपोर्टवरून मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सोमवारी नवाब तोहिद खान आणि गणेश हरिकिशन शर्मा या दोघांना अटक केली होती. त्यांनी आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याचा संशय आहे. या दोघांकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारावर
पोलिसांनी शेख वाजिद शेख मोहंमद ऊर्फ राजू बढियारा ऊर्फ अब्रार (३०) आणि चेतन ऊर्फ अविर सुनील हजारे (२४) यांना अटक केली. त्यांच्याकडून पाच रिव्हॉल्व्हर, ३७ गोळ्या ताब्यात घेतल्या, अशी माहिती पोलिस आयुक्त के. के. पाठक यांनी दिली.

गुंड राजा गौससोबत आरोपी होता मध्य प्रदेशात
या दोन्ही आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. अब्रार हा काही वर्षांपूर्वी कुख्यात राजा गौससोबत मध्य प्रदेशातील लखना दौन येथील कारागृहात होता. त्यानंतर राजा गौस हा लखना दौन तुरुंगातून पळाला होता.

कारागृहात मोबाइल, शस्त्र सापडणे सुरूच
गेल्या आठ दिवसांपासून नागपूर कारागृहाची झाडाझडती सुरू आहे. बुधवारी ९ मोबाइल, ७ बॅटरी, दोन चार्जर, चार हेडफोन, एक सिम कार्ड, १६ मेमरी कार्ड, तीन कैची, एक वस्तरा आणि पाच चिलीम सापडले.