आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माळढोकच्या संवर्धनासाठी चार कोटींचा कृती आराखडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- माळढोक या शेड्यूल एकमधील नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या पक्षाच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी 4 कोटी 36 लाखांचा कृती आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती मुख्य वनसंरक्षक डॉ. एस. एच. पाटील यांनी दिली. उडणार्‍या पक्षांतील सर्वात मोठा पक्षी असलेला माळढोक हा इमू आणि शहामृगासारखा दिसणारा पक्षी आहे. सोलापूर येथील नानज येथे माळढोक पक्षी अभयारण्य होते. पंरतु त्याचे क्षेत्रफळ कमी करण्यात आले. गवताळ प्रदेशात राहणार्‍या माळढोकची वसतिस्थाने झपाट्याने नष्ट झाली तर गवताळ प्रदेश शेतीखाली आल्याने तसेच शिकार झाल्याने संख्या झपाट्याने कमी होत गेली. आजमितीस देशभरात सुमारे 250 माळढोक उरले आहेत.

राजस्थान, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश व महाराष्ट्रात फक्त माळढोकचे अस्तित्व आहे. पावसाळा हा माळढोकचा प्रजनन काळ आहे. कधी काळी चार ते पाच माळढोक असलेल्या नागपूर विभागात आजमितीस फक्त 1 माळढोक उरला आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड व भिवापूर हद्दीत केवळ एक माळढोक दिसल्याची नोंद आहे. जिल्ह्यात पक्षांची संख्या वाढावी म्हणून माळढोक संरक्षण समिती स्थापन करण्यात आली असून मुख्य वनसंरक्षक एस. एच. पाटील समितीचे अध्यक्ष आहेत. उपवनसंरक्षक पी. के. महाजन हे सदस्य सचिव आहेत. गोपाळराव ठोसर, डॉ. अनिल पिंपळापुरे, मानद वन्यजीव संरक्षक कुंदन हाते, रोहित कारू आणि उमरेड व भिवापूर पंचायत समितीचा प्रत्येकी एक सदस्य या समितीचे सदस्य आहे.

‘ताडोबा’चे ऑनलाईन बुकींग
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे बुकींग येत्या 1 ऑगस्टपासून ऑनलाईन सुरू होणार आहे. महाऑनलाईन व टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस यांचा हा संयुक्त उपक्रम आहे. व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक व क्षेत्रीय अधिकारी वीरेंद्र तिवारी हे सामंजस्य करारावर सह्या करतील. या अंतर्गत करण्यात येणारे बुकींग रेल्वेसारखे रद्द करण्यात येणार असून त्या संबंधीची माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. या योजनेला प्रतिसाद मिळेल असा विश्वास वनाधिकार्‍यांना वाटत आहे.