नागपूर - गोंदिया विमानतळावरून मध्य प्रदेशातील पचमढीकडे निघालेले प्रशिक्षण विमान बेलखेडी येथे कोसळल्याचे बुधवारी सकाळी स्पष्ट झाले. या दुर्घटनेत सोहेल अन्सारी (मूळचा पुणे) या विमानातील एकमेव वैमानिकाचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळून आला. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सोहेल हा रायबरेली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अकादमीत प्रशिक्षणार्थी वैमानिक होता. गोंदियाचे विमानतळ या अकादमीशी संलग्न असल्याने येथे प्रशिक्षणासाठी आला होता. मंगळवारी सोहेल पचमढीकडे निघाला. दुपारी सव्वाच्या सुमारास त्याचा नागपूर हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी शेवटचा संपर्क झाला. रात्री उशिरापर्यंत संपर्क झाला नाही. तेव्हा लष्कराच्या जवानांच्या शोधकार्यात बुधवारी सकाळी त्याच्या विमानाचे अवशेष आढळले.