आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Checked Answersheet Of Engineering Subject

पाच तासांत तपासल्या 14 हजार उत्तरपत्रिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - गुणवाढ प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून पुढे आलेल्या माहितीनंतर पोलिसांनी सोमवारी (दि. १३) सकाळी ११ वाजतापासून विद्यापीठात अभियांत्रिकीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरू केले. सायंकाळी चार वाजेपर्यंत ५५ पोलिसांनी हे काम केले. पहिल्याच दिवशी जवळपास १४ हजार उत्तरपत्रिकांची तपासणी झाली असून, यामध्ये १३ उत्तरपत्रिका पोलिसांना संशयास्पद आढळल्या आहेत.

विद्यापीठातील गुणवाढ प्रकरणाचा तपास सुरू झाला, त्या वेळी विद्यापीठाने नऊ विद्यार्थ्यांनी १२ उत्तरपत्रिकांमध्ये गुणांची खोडतोड केल्याचे पोलिसांना सांगून तसा अहवाल दिला होता. याआधारे पोलिसांनी तपास सुरू केला असता, आरोपींची संख्या वाढतच आहे. सोबतच चार दिवसांपूर्वी आणखी चार खोडतोड केलेल्या उत्तरपत्रिका असल्याचे विद्यापीठानेच पोलिसांना सांगितले. त्या उत्तरपत्रिकासुद्धा पोलिसांना मिळाल्या आहेत; तसेच पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींपैकी एकाने पोलिसांना महत्त्वपूर्ण अतिशय धक्कादायक माहिती सांगितली होती. त्यामुळे पोलिसांनी हिवाळी २०१४ मध्ये झालेल्या परीक्षेतील अभियांत्रिकीच्या संपूर्ण उत्तरपत्रिका तपासणीचा निर्णय घेत सोमवारपासून या ऐतिहासिक कामाला सुरुवात केली.

सोमवारी सकाळी ११ वाजता ५५ पोलिसांचा ताफा विद्यापीठात दाखल झाला. गोपनीय विभागातील व्हरांड्यात आतमध्ये पोलिस बसले. या वेळी याच विभागाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी पोलिसांना उत्तरपत्रिका काढून दिल्या. सकाळी ११ वाजतापासून सुरू झालेले पोलिसांचे काम सायंकाळी चार वाजेपर्यंत अविरत सुरू होते. या पाच तासांत पोलिसांनी १४ हजार उत्तरपत्रिकांची तपासणी केली. पोलिसांना उत्तरपत्रिकांमधील खोडतोड गुणांमध्ये खोडतोड अन्य संशयास्पद बाबी तपासायच्या होत्या.

तपासणी करणाऱ्या पोलिसांना सूचना
विद्यापीठातपोलिस पोहोचल्यानंतर नेमके काम काय करायचे, याबाबत ठाणेदार खंडेराव तसेच परीक्षा नियंत्रक डाॅ. जे. डी. वडते यांनी पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या.

संशयितउत्तरपत्रिका विद्यापीठ समितीकडे
पोलिसांनीसोमवारी जवळपास १४ हजार उत्तरपत्रिका तपासल्यानंतर १३ उत्तरपत्रिका संशयित मिळाल्या आहेत. या उत्तरपत्रिकांची पुनर्तपासणी करण्यासाठी विद्यापीठाच्या समितीकडे पाठवण्यात येणार आहे. यामध्ये दोष असल्यास विद्यापीठाची समिती पोलिसांना माहिती देणार आहे. त्यानुसार पोलिस पुढील कारवाई करणार आहे.

महेंद्र दमकेला अटक; आरोपींची संख्या पोहोचली आता १६ वर
गुणवाढप्रकरणात पोलिसांनी सोमवारी सकाळी महाजनपुरा येथे राहणाऱ्या महेंद्र नामदेवराव दमके (३३) याला अटक केली. महेंद्र दमके हा २०११ ते २०१३ या काळात विद्यापीठात कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत होता. यापूर्वी अटक केलेल्या आरोपींनी गुणवाढ प्रकरणात महेंद्र दमके सहभागी असल्याची कबुली पोलिसांना दिली होती. त्यामुळेच साेमवारी त्याला अटक करण्यात अाली. यासह प्रकरणातील अटक आरोपींची संख्या आता १६ झाली आहे. दुसरीकडे पूर्वीच अटकेत असलेल्या प्रफुल्ल उईके अरविंद डोंगरे यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना न्यायालयात हजर केले होते. या वेळी त्यांना १६ एप्रिलपर्यंत तसेच महेंद्रला १९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

संशयित उत्तरपत्रिका आढळल्या
सोमवारपासून आम्ही उत्तरपत्रिकांची तपासणी सुरू केली आहे. १३ उत्तरपत्रिकांमध्ये संशय आढळल्यामुळे त्या आम्ही विद्यापीठाच्या समितीकडे पाठवणार आहोत. त्यांच्याकडून तपासणी अहवाल आल्यावर पुढील कारवाई होणार आहे. दुसरीकडे महेंद्र दमकेला अटक झाली आहे. त्याच्याकडूनही काही महत्त्वाची माहिती पुढे येण्याची शक्यता आहे.
- डी.सी. खंडेराव, ठाणेदार, फ्रेजरपुरा.
पुढील स्लाईडवर पाहा, इतर फोटो