आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. संतोष ठाकरेंविरोधात पोलिसांना निनावी पत्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - कुलगुरू कन्या गुणवाढ प्रकरणात अधिष्ठाता डॉ. संतोष ठाकरे यांनी राज्यपालांना खोटी माहिती दिल्याचा आराेप करणारे निनावी पत्र पोलिसांना मंगळवारी (िद. १४) प्राप्त झाले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील गुणवाढ प्रकरण चांगलेच गाजत असून, पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांच्या नावे असलेल्या या पत्रामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विद्यापीठाच्या गोपनीय विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांकडून हे पत्र पाठवण्यात आल्याने गुणवाढ प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कुलगुरू डॉ. मोहन खेडकर यांची कन्या मृणाल यांच्या गुणवाढ प्रकरणानंतर विद्यापीठात गुणवाढ घोटाळा गाजत आहे. त्यानंतर उत्तरपत्रिकांमध्ये खोडतोड करीत गुणवाढ केली जात असल्याची दोन प्रकरणे उघडकीस आली. पुनर्मूल्यांकन प्रक्रियेदरम्यान गुणवाढ केली जात असल्याची माहिती समोर येत आहे.
कुलगुरू कन्याचे गुणवाढ प्रकरणदेखील विद्यापीठाच्या गोपनीय विभागाशी संबंधित असल्याची माहिती समोर आली होती. परीक्षा विभागातील गैरप्रकार शोधून काढण्याबाबत विद्यापीठ कायद्यानुसार ३२ (६) समितीला याबाबत चौकशी करण्याचा अधिकार आहे. समाज विज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. संतोष ठाकरे हे या समितीचे अध्यक्ष असून कुलगुरू कन्येसह अन्य दोन गुणवाढ प्रकरणांची चौकशी डॉ. संतोष ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून करण्यात आली. अभियांत्रिकीतील नऊ विद्यार्थ्यांच्या गुणवाढ प्रकरणात पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. विद्यार्थ्यांसह केंद्रीय मूल्यांकन कक्षातील रोजंदारी कर्मचारी, सहमूल्यांकन अधिकाऱ्यांना देखील या प्रकरणात अटक करण्यात आली. त्यामुळे गुणवाढ प्रकरणाची व्याप्ती चांगलीच वाढत असल्याचे चित्र आहे. आता निनावी पत्राप्रकरणी पोलिस काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


अधिक माहिती घेऊ
विद्यापीठातीलगुणवाढ प्रकरणाशी संबंधित डॉ. संतोष ठाकरे यांच्याबाबत निनावी पत्र प्राप्त झाले आहे. निनावी पत्राच्या आधारे अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. निनावी पत्र पाठवणाऱ्या अर्जदाराने समोर यावे; तरच त्यांच्याकडून अधिक माहिती मिळवणे शक्य होईल.
सोमनाथ घार्गे, पोलिस उपायुक्त

राज्यपालांकडे द्या पुरावे
कुलपतींनाखोटी माहिती दिली, असे तक्रारकर्त्यांचे म्हणणे असेल, तर त्याबाबत चौकशी केली जावी. राज्यपाल कार्यालयाकडे अनेक स्वतंत्र चौकशी यंत्रणा आहेत, ते केवळ एका यंत्रणेच्या अहवालावर अवलंबून नाहीत. व्यक्ती म्हणून नाही तर कायद्याने गठित ३२ (६) प्राधिकारिणी म्हणून प्रकरणाची चौकशी केली. अहवाल मान्य, अमान्य करण्याचा अधिकार परीक्षा मंडळाला आहे. तक्रारकर्त्याकडे पुरावे असतील, तर ते त्यांनी कुलपती, कुलगुरूंकडे द्यावे. डॉ.संतोष ठाकरे, अध्यक्ष ३२ (६) समिती