आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूबंदीसाठी लढणाऱ्या पोलिस पाटलाची हत्या, यवतमाळ जिल्ह्यातील घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - प्रतिकात्मक - Divya Marathi
फोटो - प्रतिकात्मक
यवतमाळ - दारूबंदीच्या आंदोलनात पुढाकार घेणाऱ्या कारेगाव यावली गावचे पोलिस पाटील वीरेंद्र राठोड (४५) यांचा अज्ञात अाराेपींनी दगडाने ठेचून खून केला. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस अाली. अवैध दारू विक्रेत्यांकडून त्यांचा खून झाला असावा, असा संशय व्यक्त हाेत अाहे. दरम्यान, संतप्त गावकऱ्यांनी राठाेड यांचा मृतदेह अाधी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात व नंतर पालकमंत्र्यांच्या संपर्क कार्यालयात नेऊन आरोपींना अटक करण्याची मागणी केली.

राज्य सरकारने नुकतीच चंद्रपुर जिल्ह्यात दारूबंदीचा निर्णय लागू केल्यानंतर विदर्भातील अनेक गावांमध्ये दारूबंदीसाठी अांदाेलनांनी जाेर धरला अाहे. यवतमाळ जिल्ह्यातही महिला व सामाजिक कार्यकर्ते अांदाेलन करत अाहेत. राठाेड यांनी त्यासाठी पुढाकार घेतला हाेता. अनेकदा त्यांनी कारेगाव यावली परिसरात बेकायदा दारूचे अड्डे शाेधून पाेलिसांना दारू पकडून दिली होती. लवकरच ते ग्रामपंचायतीमध्ये दारूबंदीचा ठराव घेणार हाेते. गुरुवारी रात्री यावली पौड या ठिकाणी त्याच संदर्भात महिला मंडळाची बैठक घेऊन रात्री उशिरा ते दुचाकीने गावी परत येत हाेते. मात्र, सकाळपर्यंत ते घरी पोहोचलेच नाहीत.

शुक्रवारी सकाळी या दोन्ही गावांदरम्यानच्या पायवाटेवर राठाेड यांचा मृतदेह दिसून अाला. घटनेची माहिती मिळताच माेठा जमाव व पाेलिसही घटनास्थळी अाले. दरम्यान, अवैध दारू विक्रेत्यांनीच राठाेड यांचा काटा काढल्याचा आरोप ग्रामस्थांकडून हाेत अाहे. त्यावरून पाेलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले अाहे.

मृतदेहासह माेर्चा
राठाेड यांचे नातेवाईक व गावकऱ्यांनी मृतदेहासह थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. त्या ठिकाणी निवासी उपजिल्हाधिकारी व अपर पोलिस अधीक्षकांनी आरोपींना लवकरच अटक करण्याची ग्वाही दिली. त्यापाठाेपाठ जमावाने मृतदेहासह पालकमंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयात धडक दिली व अापल्या व्यथा मांडल्या. पालकमंत्र्यांनी या प्रकरणात तातडीने कारवाई होईल, असे आश्वासन दिले.