आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवाशक्तीच साकारणार महाशक्ती होण्याचे स्वप्न- राष्ट्रपती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- शेतीचे महत्त्व आता उद्योगांनाही कळायला लागले हे सुचिन्ह असून कृषी विकासासाठी उद्योगांनी पुढे येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी येथे केले.

वर्धा रोडस्थित पांजरी येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्था येथे आयोजित कृषी वसंत प्रदर्शनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल, राज्यपाल के. शंकर नारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मुख्य सचिव ज. स. सहारिया, पालकमंत्री शिवाजीराव मोघे आदी उपस्थित होते.

राष्ट्रपती म्हणाले, उद्योग आणि शेतीची सांगड घातली तर शेती आणि शेतकर्‍यांचे भविष्य अधिक उज्वल आहे. अन्न प्रक्रिया, कृषी संशोधन आदी क्षेत्रात उद्योगांना गुंतवणुकीच्या उत्तम संधी आहेत. कृषी क्षेत्रात फक्त 1 टक्के विकास झाला तरी 4 टक्के रोजगारनिर्मिती होते. शिवाय इतर क्षेत्रांवरही त्याचा सकारात्मक परिणाम होतो हे लक्षात घेता कृषी विकासासाठी उद्योगांनी पुढे येण्याची गरज आहे.

दहा वीस वर्षांपूर्वी भारत सर्वाधिक कृषी उत्पादने आयात करणारा देश होता. आपले अर्थमंत्री आणि कृषिमंत्री विदेश दौर्‍यावर गेले की अन्नधान्य, खते व इंधन आयातीचे करार करत. आज परिस्थिती बदलली आहे. आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालो असून निर्यातदार झालो आहोत. देशाच्या पूर्वेकडील राज्यात राबवलेल्या कृषी विकास योजनांमुळे आसाम, छत्तीसगड, बंगाल, ओडिशा या राज्यांतील भाताच्या उत्पादनात विक्रमी वाढ झाली. आज देशातील भाताच्या एकूण उत्पादनांपैकी 51 टक्के भात उत्पादन या राज्यांतून होते. तांदूळ निर्यातीत आपण पहिल्या व गहू निर्यातीत दुसर्‍या क्रमांकावर आहोत. कृषी विकास दर वाढल्याने अर्थव्यवस्थाही बळकट झाली आहे. कृषी विकासासाठी अनेक योजना केंद्र व राज्य सरकारने राबवल्या. अनेक सवलती दिल्याचे मुखर्जी म्हणाले.