नागपूर - राज्यात डेंग्यूचा आजार मोठ्या प्रमाणावर बळावत आहे. या रोगामुळे अनेक रुग्ण दगावत असून आजाराकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. डेंग्यूच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाने आवश्यक उपाय योजावे, असे मत व्यक्त करीत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्याचे सार्वजनिक आरोग्य विभाग, नागपूर महापालिका प्रशासनासह पाच जणांना नोटीस बजावली आहे.
नागपुरातील पूनम प्राइड कंडोमिनियम या निवासी संकुल संस्थेने डेंग्यू आजारासंदर्भात प्रशासनाकडून होणा-या हलगर्जीपणासंदर्भात एक जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणी बुधवारी न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती विनय देशपांडे यांच्या खंडपीठासमोर झाली.
नागपुरातील खामला परिसरात संचयनी कॉम्प्लेक्स आहे; परंतु या संकुलाचा उपयोग नसल्याने नागरिक तेथे केरकचरा फेकतात. त्यामुळे साचलेल्या घाण पाण्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. या संकुलातील घाणीमुळे आरोग्य धोक्यात आले आहे. घाणीची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी पालिका आणि आरोग्य विभाग जबाबदारीने पार पाडत नाहीत. त्यामुळे त्यांना याबाबत निर्देश देण्याबरोबरच सार्वजनिक ठिकाणी घाण करणा-यांवर दंड ठोठवावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांच्या वतीने खंडपीठात करण्यात आली होती.
बारामतीत महिलेचा बळी
बारामती शहरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असून बुधवारी एका महिलेचा या आजाराने मृत्यू झाला. सुहासनगर भागात राहणा-या सविता सुरेश भिसे (३७) यांच्यावर शनिवारपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मंगळवारी त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना पुण्याच्या ससून रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र बुधवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
मृतांची संख्या किती?
याचिकाकर्त्यांची बाजू ऐकल्यानंतर, नागपूर खंडपीठाने डेंग्यूला गांभीर्याने घेऊन आजपर्यंत नोंद झालेले डेंग्यूचे एकूण रुग्ण आणि दगावलेल्या रुग्णांची आकडेवारी सादर करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत.