आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prime Ministership Not A Panipuri; So Liable Person Need Ramdev Baba

पंतप्रधानपद म्हणजे गाडीवरील पाणीपुरी नव्हे; त्या जागी लायक व्यक्ती हवी - रामदेव बाबा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - पंतप्रधानपद म्हणजे हातगाडीवर मिळणारी पाणीपुरी नाही. त्या जागी ख-या अर्थाने लायक व्यक्ती यायला हवी. त्यामुळे आम्ही गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देत आहोत, असा दावा योगगुरू रामदेवबाबा यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.


पतंजली योग समिती, किसान पंचायत आणि भारत स्वाभिमान चळवळीच्या वतीने राज्यातील कार्यकर्त्यांच्या संमेलनाला मार्गदर्शन करण्यासाठी स्वामी रामदेव नागपुरात आले होते. या वेळी बोलताना त्यांनी कॉँग्रेस पक्ष आणि गांधी कुटुंबावर सडकून टीका केली. काँग्रेस हे देशावरील राष्‍ट्रीय संकट असल्याचे सांगताना 2014 ची निवडणूक ही देशाच्या राजकारणात आमूलाग्र परिवर्तन घडवणारी ठरणार आहे. एकीकडे देशाची 67 वर्षे लूट करणारे कुटुंब आहे. या कुटुंबाने देश किती लुटला, याचा हिशेब व्हायला हवा. परकीय बॅँकांमध्ये या कुटुंबाने 20 लाख कोटींचे बेनामी फिक्स डिपॉझिट ठेवल्याचा आरोप रामदेवबाबा यांनी केला. या कुटुंबापासून देशाला मुक्ती द्यायची असेल तर नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही, असेही ते म्हणाले. मोदी आणि राहुल गांधी यांची तुलनाच होऊ शकत नाही. एक नेता उत्तराखंडात संकटात सापडलेल्या जनतेला मदतीसाठी धावून जातो. त्याच वेळी दुसरा विदेशात मौजमजा करण्यात मग्न असतो. यातच सारे काही आले.


इशरत जहां प्रकरणाचे राजकारण करून कॉँग्रेस सरकार मोदींना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. अल्पसंख्याकांचे खरे नुकसान काँग्रेसनेच केले आहे. मोदींनी कधीही हा अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक असा भेदाभेद केला नाही, असे रामदेवबाबा म्हणाले. मोदींना अडवाणी यांचा विरोध नाही. अडवाणी ज्येष्ठ नेते असून ते मोदींना पित्यासमान आहेत. त्यामुळे अडवाणी यांनी आता मार्गदर्शकाचे काम करायला हवे, असे ते म्हणाले.


भाजप नेत्यांच्या पाठोपाठ योगगुरू रामदेवबाबांनीही सोमवारी राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयास भेट देऊन सरसंघचालकांसह इतर वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा केली. चर्चेचा तपशील सांगण्यास नकार देताना राष्‍ट्रहितासाठी आमचे चिंतन सुरू आहे, असे त्यांनी या वेळी सांगितले.


केंद्राच्या अपयशी धोरणामुळे देशात गृहयुद्ध भडकेल !
बुद्धगया येथील बॉम्बस्फोट हा देशाच्या सांस्कृतिक केंद्रावरील हल्ला आहे. हा हल्ला थोपवण्यास केंद्र सरकार सपशेल अपयशी ठरले. हे धोरण कायम राहिले तर दहशतवादी आणि नक्षलवाद्यांचे धाडस आणखी वाढेल आणि त्याचे पर्यवसान गृहयुद्धात होईल, पंतप्रधान रोबोट असून त्यांचा रिमोट विदेशी व्यक्तींच्या हाती आहे, असा आरोपही रामदेव यांनी केला.