आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदीवान म्हणतोय, ‘घर देता का घर’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक वि. वा. शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज यांच्या ‘नटसम्राट' या गाजलेल्या नाटकातील कफल्लक नटसम्राटाच्या तोंडी असलेला ‘कुणी घर देता का घर?’ हा संवाद मानवी मनाला हेलावून सोडतो. असाच काहीसा अनुभव सध्या मोर्शी येथील खुल्या कारागृह प्रशासनाला येत आहे. स्वत:चे घर नसल्याने भिंतीवाचून, छपरावाचून जीवन जगणार्‍या सध्या मोर्शी येथील खुल्या कारागृहात शिक्षा भोगणार्‍या एका बंदीवानाने शासनाकडे घरकुलाची मागणी केली आहे. कारागृहच माझे घर. बाहेर पडल्यावर होईन बेघर, अशी भावना त्याने व्यक्त केली आहे. बंदीवानाचा हा अर्ज मोर्शी कारागृह प्रशासनाने नागपूर जिल्हा प्रशासनाकडे पाठवला आहे.

नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात असलेल्या वडोदा येथील भूपती ऊर्फ धनराज उदाराम काटवले (३२) असे या बंदीचे नाव आहे. धनराज २००२ पासून कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. गावात स्वत:चे घर नाही. त्यामुळे कारागृहातून सुटका झाल्यानंतर राहायचे कुठे, हा त्याच्यापुढे प्रश्न आहे. सध्या कारागृहच आपले घर आहे. मात्र, या दरम्यान मिळणार्‍या सुट्यांमध्ये राहायचे कुठे, सुटकेनंतरचे आयुष्य काढण्यासाठी घराची नितांत आवश्यकता आहे, स्वत:चे घर असल्यास सुटीदरम्यान घरी थांबता येईल, यासाठी आपल्याला शासनाच्या राजीव गांधी आवास योजनेंतर्गत घर मिळावे, असा अर्ज धनराजने मोर्शी कारागृह अधीक्षकांकडे केला आहे. मार्चला हा अर्ज मोर्शी कारागृह प्रशासनाने नागपूर जिल्हा प्रशासनाकडे पाठवला आहे.

ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील तसेच दारिद्र्यरेषेवरील बेघर, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अल्पभूधारक गरजूंसाठी शासनाच्या घरवाटपाच्या योजना आहे. काही योजनांमध्ये लाभार्थींकडे उपलब्ध असलेल्या जागेवर घरबांधणीसाठी ठरलेला निधी शासनाकडून देण्यात येतो. बंदींना या योजनेचा लाभ देऊ नये, असे कुठेही म्हटलेले नाही. त्यामुळे आवश्यक निकष पूर्ण केल्यास या बंदीलाही घर मिळू शकते.

नागपूर जिल्हा प्रशासनाकडे पाठवला बंदीवानाचा अर्ज
सध्या आमच्याकडे शिक्षा भोगत असलेल्या बंदीवानाने राजीव गांधी आवास योजनेतून घर मिळावे, असा अर्ज नागपूर जिल्हा प्रशासनाच्या नावाने केला होता. हा अर्ज आम्ही मार्चलाच नागपूर प्रशासनाकडे पाठवला आहे. शासकीय योजनेमधून घर देण्याबाबतचा निर्णय नागपूर प्रशासन घेईल. श्री.भोईते, प्रभारी अधीक्षक, खुले कारागृह, मोर्शी.

शासकीय योजनांमधून लाभ
शासकीय योजनांमधून सर्वसामान्य व्यक्ती निकषांची पूर्तता करून घरकूल किंवा अन्य योजनांचा लाभ घेऊ शकतात. अशावेळी बंदींनासुद्धा हा लाभ घेता येतो, यासाठी आवश्यक निकष मात्र त्याला पूर्ण करण्याची गरज आहे. बंदी आहे किंवा तो शिक्षा तो भोगत असल्यामुळे त्याला शासकीय योजनेचा लाभ घेता येत नाही, असा नियम नाही, असे महसूल विभागातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले आहे.