आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भ्रष्टाचार्‍यांना संरक्षण नाही - मुख्यमंत्री चव्हाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - भ्रष्टाचार्‍यांना पाठीशी घातल्याचे आरोप साफ फेटाळून लावताना आरोपांसाठी मुद्दे शोधणे हे विरोधी पक्षांचे कामच असल्याचे उत्तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी नागपुरात बोलताना दिले.

मध्य प्रदेश सीमेवरील तपासणी नाक्याचे उद्घाटन तसेच मध्य प्रदेशातील प्रचाराच्या निमित्ताने मुख्यमंत्री नागपुरात आले होते. या वेळी रामगिरी बंगल्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तीन वर्षांच्या कार्यकाळात मुख्यमंत्र्यांनी स्वत:ची प्रतिमा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करताना भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घातले, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष फडणवीस यांनी केला होता. त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी आरोप फेटाळून लावला. आरोपांसाठी मुद्दे शोधणे हे विरोधी पक्षांचे कामच आहे. मात्र, सरकार म्हणून काम करताना कायद्याच्या आधारेच कुठली कारवाई करावी लागते. त्यात न्यायालयीन चौकशीचे विषयही असतात. त्यामुळे मी कुणाला पाठीशी घालण्याचा प्रश्नच नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

आदर्श अहवाल जाहीर होणार असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. अरबी समुद्रातील शिवछत्रपतींचे स्मारक, इंदू मिलच्या जागेवरील स्मारकासंदर्भात होत असलेल्या विलंबावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, कुठलाही प्रकल्प राबवताना एका प्रक्रियेतून जावे लागते. पर्यावरण विषयक परवानगी मिळायला वेळ लागतो. मात्र, या दोन्ही योजनांवरील प्रक्रिया सुरू आहे. आघाडी सरकारमधील मतभेदांवर मुख्यमंत्र्यांनी अतिशय गुळगुळीत उत्तर दिले. जागावाटपाच्या 29 आणि 19 फॉर्म्युल्यावर दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू असून, लवकरच तोडगा काढला जाईल, असे त्यांनी सांगितले. अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना मदत देण्यात विलंब होत असला तरी, आता काम सुरू झाले आहे, असे ते म्हणाले. विदर्भात शेतकर्‍यांच्या आत्महत्या सुरूच आहेत, याकडे लक्ष वेधले असता मुख्यमंत्र्यांनी सिंचनाच्या सुविधा, शेतीपूरक उद्योगांना चालना देण्यासाठी प्रयत्न होत आहेत. त्यासाठी काही वेळ लागणार आहे, असे उत्तर दिले.

नागपुरात 21 नोव्हेंबरला जीवनदायीचा शुभारंभ
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या राज्यस्तरीय विस्ताराचा शुभारंभ 21 नोव्हेंबर रोजी नागपुरात यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्याची ही महत्त्वाकांक्षी योजना असल्याचे त्यांनी सांगितले. या समारंभासाठी विदर्भातून दीड ते दोन लाख काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित राहतील, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिली.