आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हजारो बाळांना मिळाले ‘दो बूँद जिंदगी के’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- राष्ट्रव्यापी मोहिमेंतर्गत रविवारी येथे हजारो बाळांना पल्स पोलिओची मात्रा (दो बूँद जिंदगी के) देण्यात आली. त्यासाठी शहरात 306 बूथस् उघडण्यात आले होते. 54 सुपरवायझर आणि 752 कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही मोहीम फत्ते झाली. सकाळी आठ वाजता सुरू झालेले पोलिओचे लसीकरण सायंकाळी पाचच्या पुढेही सुरूच होते.

शासकीय रुग्णालये, महापालिकेचे दवाखाने, बस स्टँड, रेल्वे स्थानक यांसारख्या सार्वजनिक ठिकाणांसह शहरातील सर्व 86 वार्डांमध्ये पोलिओ लसीकरणाचे बूथस् उघडण्यात आले होते. महापालिकेच्या 12 शहरी आरोग्य केंद्रांमार्फत ही अस्थायी यंत्रणा उभी करण्यात आली होती. सायंकाळी पाच वाजेपर्यंत 50 हजारांवर बालकांना पोलिओची मात्रा देण्यात आल्याची नोंद पालिकेचे जनसंपर्क अधिकारी भूषण पुसदकर यांच्याकडे झाली होती. दरम्यान, सर्व 306 केंद्रांवरील आकड्यांची नेमकी जुळवाजुळव उशिरा सायंकाळपर्यंत पूर्ण होईल, असे त्यांचे म्हणणे होते.

पोलिओमुक्त भारतासाठी दरवर्षी पल्स पोलिओ लसीकरण केले जाते. यावर्षीचा हा पहिलाच टप्पा होता. पुढील महिन्याच्या 23 तारखेला पाच वर्षांच्या आतील बाळांना पोलिओचा डोज परत दिला जाणार आहे.

डोज न घेता आलेल्यांना पुन्हा संधी
प्रवास, अनुपस्थिती, अवेळ आदी कारणांनी ज्या बाळांना रविवारी पोलिओचा डोज घेता आला नाही. त्यांच्यासाठी आणखी पाच दिवस ही संधी आहे. सोमवारपासून महापालिकेची यंत्रणा संपूर्ण शहरात पोलिओ डोज मिळाल्याची खात्री करेल. सुटलेल्या नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अशोक राठी यांनी केले आहे.

जिल्ह्यातही लसीकरण यशस्वी
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात लसीकरण मोहीम राबवण्यात आली. शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, अंगणवाड्यांत पोलिओचा डोज पाजण्यात आला. यासाठी शिक्षक, जिल्हा परिषद आरोग्य कर्मचार्‍यांची मदत घेण्यात आली. लसीकरण मोहिमेसाठी जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळाला.