आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रार्थनास्थळाच्या पायर्‍या तोडल्या, मालेगावात तणाव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाशिम- जिल्ह्यातील मालेगाव येथे मंगळवारी दुपारी अवैध नळजोडणी उखडून काढताना एका प्रार्थनास्थळाच्या पायर्‍या तोडण्यात आल्याने तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी ग्रामपंचायतच्या तीन कर्मचार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना फरार करण्यात सहकार्य करणारा सुनील शर्मा यास अटक करण्यात आली.

मालेगाव येथे वॉर्ड एकमधील एका प्रार्थना स्थळाला अवैध नळजोडणीद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे, अशी चुकीची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाला मिळाली होती. प्रत्यक्षात या ठिकाणी खासगी विहिरीतून पाणीपुरवठा होत होता; परंतु प्रशासनाने कुठलीही शहानिशा न करता या ठिकाणी खोदकाम केले, प्रार्थनास्थळाच्या पायर्‍याही तोडल्या. त्यामुळे शेकडो नागरिक घटनास्थळी जमा झाले व तणाव वाढला. काही वेळातच बाजारपेठही बंद झाली. ग्रामपंचायत कर्मचार्‍यांवर कारवाईच्या मागणीसाठी जमावाने पोलिस ठाण्यात ठिय्या दिला, त्यामुळे पोलिसांनी ग्रामपंचायत कर्मचारी संजय दहात्रे, सतीश देवकते व महादेव ठाकरे यांच्याविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल केला. वातावरण चिघळल्याने हे तिघेही फरार झाले होते. त्यांना पळून जाण्यात मदत केल्याचा ठपका ठेवत ग्रामपंचायत सदस्याचा मुलगा सुनील शर्माला अटक करण्यात आली. सध्या गावात कडक पोलिस बंदोबस्त आहे.