आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhi Asks Congress Workers To Stop Internal Conflicts

कॉंग्रेसच्‍याच लोकांमुळे होतो पराभव, गटबाजी टाळाः राहुल गांधींच्‍या कानपिचक्‍या

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॉंग्रेसचा पराभव कॉंग्रेसचेच लोक करतात. गटबाजीमुळे पक्षाचे नुकसान होते. त्‍यामुळे आपसातील भांडणे मिटवा, असा सल्‍ला देतानाच कॉंग्रेसेचे युवराज आणि उपाध्‍यक्ष राहुल गांधी नेते आणि कार्यकर्त्‍यांना कानपिचक्‍या दिल्‍या. नागपूरजवळ सुराबर्डी येथे राज्‍यभरातील जिल्‍हा पदाधिकारी आणि ब्‍लॉक अध्‍यक्षांचा मेळावा कॉंग्रेसने घेतला. त्‍यात राहुल गांधी यांनी संवाद साधला. या मेळाव्‍यापासून मुख्‍यमंत्री आणि प्रदेशाध्‍यक्षांना दूर ठेवण्‍यात आले होते.

कार्यकर्त्‍यांनी राहुल गांधींसमोर तक्रारींचा पाढाच वाचला. मंत्री आणि नेते दखल घेत नाही, कामे करत नाही, असा या तक्रारींचा सूर होता. यावेळी राज्‍याचे सांस्‍कृतिक कार्य मंत्री संजय देवतळे यांची राहुल गांधी यांनी खरडपट्टी काढल्‍याची माहिती सुत्रांनी दिली. अहेरी येथील तालुका अध्‍यक्ष मेहबूब अली यांनी देवतळे यांच्‍याविरुद्ध तक्रार केली. संजय देवतळे जिल्‍ह्यात येतात. परंतु, ते कधीही बैठका घेत नाही, पत्रांना उत्तरे देत नाहीत, असे मेहबूब अली म्‍हणाले. त्‍यावर, 'संजय देवतले कौन है', असे राहुल गांधींनी विचारले. तेव्‍हा संजय देवतळे उभे राहिले. 'आप बैठीये, बोलिये मत, काम किजिये', अशा शब्‍दात राहुल यांनी त्‍यांना सुनावल्‍याचे सुत्रांनी सांगितले.

यापुढे उमेदवार निवडताना जिल्‍हाध्‍यचांपासून ब्‍लॉक अध्‍यक्षांपर्यंत सर्वांनाच विश्‍वासात घेण्‍यात येईल, असे आश्‍वासन राहुल यांनी दिले. कार्यकर्त्‍यांनी गटबाजी टाळण्‍याची सूचना राहुल यांनी सर्वांना केली. कॉंग्रेसच्‍याच लोकांमुळे कॉंग्रेसचा पराभव होतो. यापुढे असे होऊ देऊ नका. केंद्र सरकारच्‍या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला.

मेळाव्‍यात 4-4 जिल्‍ह्यांचे गट होते. एका वेळेस 4 जिल्‍ह्यांचे पद‍ाधिकारी आणि कार्यकर्त्‍यांसोबत राहुल यांनी संवाद साधला. अनेक जणांनी राष्‍ट्रवादी कॉंग्रेससोबत आघाडी नको, असा सुर लावला. परंतु, त्‍यावर राहुल गांधी काहीही बोलले नाही.

सभामंडपात राहुल गांधी आणि कार्यकर्त्‍यांमध्‍ये बरेच अंतर होते. त्‍यामुळे त्‍यांनी स्‍वतः खुची उचलली आणि कार्यकर्त्‍यांजवळ बसले. अनेकदा ते माईक घेऊन कार्यकर्त्‍यांच्‍या मध्‍ये फिरले. कॉंग्रेसचे महाराष्‍ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांना कार्यकर्त्‍यांच्‍या तक्रारींकडे लक्ष देण्‍याच्‍या सूचनाही राहुल यांनी केल्‍या.