आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘युवराजां’च्या सभेचा 600 परीक्षार्थींना फटका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्धा - गरीब, मध्यमवर्गीय माणसाचे भविष्य उज्ज्वल करण्याचे दावे करून मतदारांना स्वप्नरंजनात रमवणार्‍या काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभेचा शुक्रवारी वर्ध्यातील सुमारे 600 शाळकरी विद्यार्थ्यांना फटका बसला. या सभेमुळे या विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षेचा पेपर ऐनवेळी रद्द करण्यात आला, त्यामुळे परीक्षार्थी व पालकांना मनस्ताप सहन करावा लागला.

वर्ध्यातील काँग्रेसचे उमेदवार सागर मेघे यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांची प्रचारसभा शुक्रवारी दुपारी लोक महाविद्यालयाच्या प्रांगणावर आयोजित करण्यात आली होती. सुमारे पन्नास हजार नागरिकांची व्यवस्था या मैदानावर करण्यात आली होती. चोख पोलिस बंदोबस्त तैनात करून सर्व रस्तेही बंद करण्यात आले होते. या सभास्थळालगत असलेल्या तुकडोजी विद्यालयात सकाळी व दुपारी अशा दोन टप्प्यांत वार्षिक परीक्षा सुरू आहेत; परंतु सभेमुळे होणारी गर्दी व आवाजाच्या अडथळ्यामुळे संबंधित शाळेने आजची परीक्षाच रद्द करून टाकली.

त्रास होऊ नये म्हणून निर्णय
राहुल गांधी यांची सभा असल्यामुळे वाहतूक आणि सभेचा आवाज यामुळे विद्यार्थ्यांना पेपर सोडवताना त्रास झाला असता. त्यामुळे आजचा पेपर रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला. - एस. सी. बोबडे, मुख्याध्यापक

‘वुई वाँट जस्टिस; युवकांची घोषणाबाजी
‘वुई वाँट जस्टिस’ अशी नारेबाजी करत व पोस्टर्स झळकावत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी राहुल गांधींच्या सभेत घोषणाबाजी केली. दरम्यान, राहुल गांधींनी सभेनंतर भेटण्याचे आश्वासन दिल्यानंतर ही घोषणाबाजी थांबली.

नागपूर विद्यापीठाने मुदतवाढ न दिल्याने या विद्यार्थ्यांचे एक वर्ष धोक्यात आले आहे. 2012-2013 मध्ये अभियांत्रिकीचे सत्र 90 दिवसांचे अपेक्षित होते; पण प्राध्यापकांच्या संपामुळे केवळ 55 दिवसांचेच सत्र झाले. अध्यापनाअभावी बरेचसे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. त्या वेळी आंदोलनानंतर विद्यापीठाच्या आश्वासनानुसार विद्यार्थ्यांनी द्वितीय वर्षास प्रवेश घेतला. मात्र, परीक्षा महिनाभरावर असताना विद्यापीठाने त्यांचा प्रवेशच अवैध ठरविला. हा प्रश्न विद्यार्थ्यांनी गांधींसमोर मांडण्याचा प्रयत्न केला.