आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘गुजरात मॉडेल’चाही फुगा फुटेल : राहुल गांधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्धा - ‘देशातील 70 कोटी लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी काँग्रेस महत्त्वाकांक्षी धोरण राबवणार आहे’, अशी घोषणा खासदार राहुल गांधी यांनी वर्ध्याच्या सभेत केली. ‘2004, 2009 च्या निवडणुकीत भाजपचा इंडिया शायनिंगचा फुगा मतदारांनी फोडला. आता त्यांनी ‘गुजरात मॉडेल’चा नवा गॅस भरलेला फुगा आणला आहे. हा फुगादेखील मतदार फोडतील,’ अशी टीकाही त्यांनी केली.

उपेक्षित घटकांच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नवीन वस्त्र धोरणामुळे नवीन संधी निर्माण होणार आहेत. 490 कोटी रुपयांच्या गांधी फॉर टुमारो प्रकल्पाचा उल्लेख करत पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न राहील. काँग्रेसने मनरेगाअंतर्गत रोजगाराची हमी, अन्न सुरक्षा, भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी माहिती अधिकाराचे शस्त्र दिले. महाराष्ट्राचे विकासाचे मॉडेल चांगले असल्याचेही ते म्हणाले.

कर्जमाफीला विरोधकांचा विरोध
शेतकर्‍यांसाठी 70 हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीला विरोधकांचा विरोध होता. मात्र, त्यास भीक न घालता शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यात आली. जमीन अधिग्रहण कायद्यामुळे शेतकर्‍यांना बाजारभावाप्रमाणे जमीन विकण्याचे स्वातंत्र्य मिळाले, यालाही विरोध झाला होता.

महिलांना आरक्षण देणार
लोकसभा, विधानसभा,पंचायत समिती, उद्योगांमध्ये महिलांना स्थान मिळाल्याशिवाय देश ‘सुपर पॉवर’ होऊ शकणार नाही. महिलांचे 33 टक्के आरक्षणाचे विधेयक केवळ विरोधकांमुळे संसदेत पारित झाले नाही. येत्या काळात हे विधेयकही मंजूर करून दाखवू, असे ते म्हणाले. दिल्ली-मुंबई-चेन्नई, दिल्ली-कोलकाता, असा डेडिकेटेड कोरिडोर बनवणार असून, त्यामध्ये रस्ते, विद्युत प्रकल्प आदींची निर्मिती केली जाईल. यातून युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. आता गरिबांना आरोग्य, घराचा अधिकार देणार असल्याचे धोरण असल्याचेही त्यांनी सांगितले.

दुष्काळावर मात करण्यासाठी एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम
देशात ओला दुष्काळ आणि कोरडा दुष्काळाची झळ सतत शेतकर्‍यांना सोसावी लागत आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम मोठ्या स्तरावर राबवून 250 लाख हेक्टर शेतीला त्याचा लाभ होईल, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.

भाजपला झुंडशाही आणायची आहे - मुख्यमंत्री चव्हाण
भाजपला देशात झुंडशाही आणायची आहे. या प्रवृत्तीविरुद्ध लढण्यासाठी कटिबद्ध व्हा, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. नेहरू, गांधी कुटुंबाचे वर्ध्याशी जवळचे नाते असल्याचे सांगून या वेळी प्रचाराचा शुभारंभ वर्ध्यातून करण्यात येत आहे. दुष्काळग्रस्त, अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना पॅकेजच्या माध्यमातून मदत केली. नैसर्गिक आपत्तीत इतर राज्यांच्या तुलनेत मोठी मदत केली. काँग्रेसने राबवलेल्या आर्थिक धोरणांमुळे प्रगतीचा वेग वाढला आहे. विदर्भाच्या पाठीशी उभे राहू, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मोहन प्रकाश, उमेदवार सागर मेघे यांचे भाषण झाले.