आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पावसाचे ‘टाइम प्लीज’; चंद्रपुरात जलस्तर कमी होत असल्याने दिलासा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- चंद्रपूर जिल्ह्यात पाऊस थांबल्याने पूरपरिस्थितीत थोडीफार सुधारणा झाली आहे. शहरातील किमान 17 वॉर्डांमध्ये शनिवारीही पुराचे पाणी कायम असले तरी जलस्तर कमी होत असल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे, तर दुसरीकडे राज्यातील अनेक जिल्ह्यांत पाऊस थांबला असला तरी अनेक धरणांतून विसर्ग सुरूच आहे.

शुक्रवारी चंद्रपूर शहरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. झरपट आणि इरई नद्यांच्या पुराचे पाणी शहरातील वस्त्यांमध्ये शिरल्याने मोठे संकट निर्माण झाले होते. शहरातील जवळपास 17 वॉर्डांमध्ये पुराचे पाणी शनिवारीही कायम होते. जलस्तर कमी झाल्याने थोडाफार दिलासा मिळाला आहे. रहमतनगर, विठ्ठल मंदिर, पठाणपुरा, सिस्टर कॉलनी, जगन्नाथबाबानगर यासारख्या वस्त्यांना पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला. सुमारे बावीसशे कुटुंबांना बोटींचा वापर करून सुरक्षितस्थळी हलवावे लागले आहे.

वर्धा नदी तुडुंब भरली
शुक्रवारी सायंकाळपासून पाऊस थांबल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. इरई धरणाचे दरवाजे शुक्रवारी सायंकाळपासून बंद करण्यात आले आहेत. इरई नदी वर्धा नदीला जाऊन मिळते. वर्धा नदीच फुगली असल्याने इरईतील पाण्याचा निचरा व्हायला वेळ लागत आहे. पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी दीपक म्हैसेकर यांच्या मार्गदर्शनात प्रशासन शनिवारीही झटत होते. पाणी मोठय़ा प्रमाणात साचलेल्या वस्त्यांमध्ये लोकांना अद्यापही घराबाहेर पडता येत नसल्याच्या तक्रारी आहेत. अत्यावश्यक परिस्थितीत बोटी मागवून घेण्याचे प्रयत्न नागरिकांकडून होत आहेत. पाण्याचा पूर्णपणे निचरा व्हायला चोवीस तास लागतील, असा अंदाज चंद्रपूर प्रशासनाने वर्तवला आहे.

उपराजधानीत सूर्यदर्शन
उपराजधानी नागपुरात शनिवारी अनेक दिवसानंतर सूर्यदर्शन झाले. शुक्रवारी तुरळक पाऊस पडला. मात्र, त्यानंतर पावसाने विश्राती घेतल्याने नागरिकांना सततच्या पावसातून दिलासा मिळाला आहे.

2200 कुटुंबांना हलवले
मान्सून सुरू झाल्यानंतर पावसाने विदर्भात चांगलीच कृपादृष्टी दाखवली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात यंदा दोनदा आलेल्या पुरांमुळे नागरिकांना चांगलेच भंडावून सोडले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे चंद्रपुरातील अनेक भागांत पाणी साचले. त्यामुळे उपाययोजना म्हणून 2200 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

गडचिरोलीतही सुधारणा
गडचिरोली जिल्ह्यातील पूरपरिस्थितीतही सुधारणा होत आहे. शुक्रवारपासून जिल्ह्यात पाऊस नसल्याने नद्यांचे पाणी वेगाने ओसरत आहे. गडचिरोली-चामोर्शी, आष्टी-चंद्रपूर, चंद्रपूर गडचिरोली मार्ग अद्याप वाहतुकीसाठी बंदच आहे. गडचिरोली-नागपूर मार्ग शनिवारी सायंकाळपासून सुरू झाला. दरम्यान, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत पावसाने विश्रांती घेतली आहे.